नागपूर जिल्ह्य़ातील नदी आणि नाल्यांच्या काठावर वसलेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांना धोका असल्याचे सोमवार आणि मंगळावारी झालेल्या जोरदार पावसातून स्पष्ट झाले आहे. वर्धमान नगरातील सेंट झेवियर हायस्कूलमधून दीडशे आणि भांडे प्लॉट चौकातील आयकॅड अ‍ॅकेडमीच्या ११५ विद्यार्थ्यांची पाण्याने वेढलेल्या परिस्थितीतून सुटका करण्यात आली. जोरदार पावसामुळे एखादी दुर्घटना घडण्याची भीती असतानाही धोकादायक स्थितीत या शाळा चालविल्या जात असून अशा असंख्य शाळा शहरात आहेत.
सेंट झेवियर हायस्कूल नागनदीच्या अगदी काठावर आहे. या शाळेत ६५० विद्यार्थी शिकतात. सोमवारी आणि मंगळवारी जोरदार पाऊस झाल्याने शाळेभोवताल पाणी साचले होते. शाळेच्या परिसरातही पाणी शिरले. पाण्याच्या वेढय़ात अडकलेल्या विद्यार्थ्यांची दोराच्या साह्य़ाने सुटका करावी लागली. दोन दिवस शाळेला सुटी देण्यात आली होती.
या भागात पाच ते सहा फुटापर्यंत पाणी तुंबलेले होते. रस्त्यांवरही पाणी साचल्याने शाळेत जाण्याची सोय नव्हती. हर्षल मेश्राम नावाचा ९ वर्षांचा मुलगा पाण्याबरोबर वाहून गेला. त्याचे पार्थिवच घरी आणावे लागले होते. या पाश्र्वभूमीवर पूरप्रवण क्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांचेही भवितव्य टांगणीवर लागले आहे.
महापालिकेच्या गौरीनगरातील हिंदी प्राथमिक शाळेत मुसळधार पावसाने कहर केला. या पाश्र्वभूमीवर नदी-नाल्यांकाठच्या शाळांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
शाळांच्या माध्यमातून कोटय़वधींची कमाई करणारे स्कूल माफिया मुलांच्या आणि आणि इमारतींच्या सुरक्षितेकडे दुर्लक्ष करीत असतानाही संबधित यंत्रणा मूग गिळून स्वस्थ बसली आहे. सेट झेवियर किंवा गौरीनगरातील महापालिका शाळा हिमनगाचे टोक आहे. अशा डझनावारी शाळांमध्ये तीन दिवसांपूर्वी पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. सुदैव एवढेच की शाळा सुरू झालेल्या नव्हत्या. महापालिकेच्या यंत्रणेने पावसाळी संकटासाठी सज्ज असल्याचे दावे केले होते. परंतु, संपूर्ण परिस्थितीचा र्सवकष विचार करण्यात आला नव्हता ही वस्तुस्थिती यानिमित्ताने उघड झाली आहे.
फक्त सावधगिरीचे इशारे देऊन भागणार नाही, असे काही पालकांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. पावसाळी दुर्घटनांमध्ये शाळेत पाणी शिरणे, इमारत कोसळणे, मुले वाहून जाणे यापैकी काहीही घडू शकते. तरीही यंत्रणेने याकडे साफ दुर्लक्ष चालविले आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताशी हा पोरखेळ असल्याची प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली.