गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण करूनही प्रीतीश वीरेंद्र दहीकर या सहावीतील विद्यार्थ्यांला शिष्यवृत्ती मिळाली नाही. प्रीतीशच्या शिष्यवृत्तीसाठी मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापकांनी प्रयत्न करूनही त्याला गेल्या वर्षभरापासून शिष्यवृत्ती मिळालेली नाही.
प्रीतीश सदरमधील सेंट फ्रांसिस डिसेल या शाळेत सहावीत शिकत आहे. त्याचे वडील खाजगी काम करतात. पुण्याच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित पूर्वमाध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा २०१२ या वर्षी ३०० पैकी १८२ गुण मिळवून प्रीतीश उत्तीर्ण झाला. मात्र शाळा प्रशासन व  शैक्षणिक विभागामार्फत शिष्यवृत्ती पात्रतेबाबत त्याला कोणतीही सूचना दिली गेली नाही. म्हणून त्याच्यातर्फे पालकांनी माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत माध्यमिक शिक्षण विभागाकडे माहिती मागवली.
शिक्षणाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एसएफएस शाळेतील विद्यार्थी प्रीतीशला शिष्यवृत्ती  परीक्षेत ३०० गुणांपैकी १८२ गुण प्राप्त झाले असून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरत असल्यास विहित नमुन्यात शाळेच्या मुख्याध्यापकांच्या शिफारशीसह प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करावा, जेणेकरून पुढील कार्यवाही करता येईल, अशी माहितीही पुरवण्यात आली.
प्रीतीशने पालकांच्या मदतीने शाळा व्यवस्थापकांशी संपर्क  साधून झालेल्या घटनेचा वृत्तांत सांगितला. त्यांनी बँकेमध्ये खाते उघडण्याचे सुचवून शाळेत खाते क्रमांक कळवण्याचे सुचवले. प्रीतीशने ताबडतोब बँकेत खाते उघडले व खाते क्रमांकासह बँक पासबुकची फोटोकॉपी शाळेत जमा केली. शाळा व्यवस्थापकांनी यावर्षी ७ फेब्रुवारीला प्रीतीशचा शिष्यवृत्ती प्रस्ताव मुख्याध्यापकाच्या शिफारस पत्रासह जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना पाठवला. परंतु अद्यापपर्यंत प्रीतीश शिष्यवृत्तीपासून वंचित आहे. शिष्यवृत्तीची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी प्रीतीशच्या पालकांनी ऐपत नसतानाही शिकवणी वर्ग लावून दिले होते. त्याच्या व पालकांच्या मेहनतीने त्याने परीक्षाही उत्तीर्ण  केली. मात्र, त्याला अजूनही शिष्यवृत्ती मिळालेली नाही.