* दोन वर्षांत २० हजार विद्यार्थ्यांचा रामराम
* मराठी शाळांमध्ये जूनपासून सेमी इंग्रजी माध्यम सुरू होणार
मुंबई महापालिकेच्या शाळांच्या खालावलेल्या दर्जाला कंटाळून गेल्या दोन वर्षांत मराठी माध्यमातून २० हजार विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या शाळांना टाटा करून खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. अशाच प्रकारे मुलांची गळती सुरू राहिल्यास महापालिकांच्या मराठी माध्यमाच्या शाळाच बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी येत्या शैक्षिणक वर्षांपासून मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
 मुंबईतील खाजगी शाळा प्रत्येक विद्याथ्यार्ंमागे वर्षांला १५ ते ३० हजार रूपये खर्च करते. याउलट महापालिका प्रत्येक विद्यार्थ्यांमागे ५३ हजार रूपये खर्च करते. तरीही या शाळांचा दर्जा अत्यंत सुमार असल्यामुळे विद्यार्थ्यांची घट होत असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडण्याच्या वाढत्या संख्येबद्दल विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्त्तर देताना मराठी माध्यमाच्या शाळांमधून गेल्या दोन वर्षांत २० हजार मुलांची गळती झाल्याची माहिती मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिली. पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे असलेल्या ओढय़ामुळे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची घट होत असली तरी मराठी माध्यमाच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षांपासून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शाळा गुणवत्ता वाढ कार्यक्रमही सुरू करण्यात आला असून ब्रिटीश कौन्सिलच्या मदतीने महापालिका शाळांमधील शिक्षकांना इंग्रजीचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.