कडकडीत उन्हे, रोरावणारा वारा आणि क्वचित कुठे, कधीतरी बरसणारा पाऊस.. या कशाचीही तमा न बाळगता विठुरायाच्या भेटीसाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या भक्तीचा अनुभव फक्त वारीत सहभागी झाल्यावरच मिळू शकतो. दिंडय़ा, पताका, भजन आणि कीर्तनातून जीवनाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी वारीमध्ये मिळते. विद्यार्थाना ही वारी ‘याची देही याचि डोळा’ अनुभवता यावी, या उद्देशाने अंबरनाथच्या पंचकोशाधारित गुरुकुल शाळेने ३४ विद्यार्थाना वारीमध्ये सहभागी होण्याची संधी दिली होती. वारीतील दोन दिवसांच्या सहभागाने एक वेगळी अनुभूती मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
वेळेचे व्यवस्थापन, दिंडय़ाचे, रिंगणांचे नियोजन आणि वारकऱ्यांच्या संघटितपणे चालणाऱ्या कामकाजाचे धडे विद्यार्थ्यांनी वारीत घेतले. त्याचप्रमाणे आधुनिक युगात अपरिहार्य ठरणाऱ्या तणावांचा निचराही वारीत होत असल्याचे त्यांनी अनुभवले. वारकऱ्यांमधील ही निष्ठा, संयम, शिस्त, निग्रह आणि समजूतदारपणा अंगी बाणवल्यास आपणही भावी आयुष्यात यशस्वी होऊ शकतो, हे त्यांना पटले.
अंबरनाथची पंचकोशाधारित गुरुकुल शाळा गेल्या अनेक वर्षांपासून असे अनुभव देणारे कार्यक्रम राबवत आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेच्या वतीने पूर्वी शहरामध्ये दिंडीचे आयोजन करण्यात येत असे. मात्र हा अत्यंत मर्यादित अनुभव होता, वारीची व्यापकता यातून मुलांपर्यंत पोहचू शकत नव्हती. त्यामुळेच गेल्या चार वर्षांपासून विद्यार्थाना प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला.
यंदा विद्यार्थी आणि शिक्षक अशी टीम वारीमध्ये सहभागी झाली होती. २५ जून रोजी कोयना एक्स्प्रेसने विद्यार्थी जेजुरीला रवाना झाले. जेजुरी गडावरील खंडेरायाचे दर्शन घेऊन विद्यार्थी पालखीच्या मुक्कामावर दाखल झाले. माऊलींच्या वारीमध्ये हे विद्यार्थी सहभागी झाले होते. माऊलीच्या अश्वापुढील रामकृष्ण हरी पनवेलकर महाराजांच्या दिंडीमध्ये विद्यार्थी विद्याìथनी सहभागी झाले होते.
वारीतील सहभागी वारकऱ्यांशी संवाद, त्यांच्या वारीमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा याची माहिती करून घेणे तसेच वारीचा परिपूर्ण आनंद घेणे हा विद्यार्थाचा प्रयत्न होता. वारीतील भजन, कीर्तन, वारीतले खेळ या सर्वाचा मनसोक्त आनंद या विद्यार्थ्यांनी घेतला. त्यांच्यासोबत विश्वनाथ काळे, मनीषा आवटी आदीजण उपस्थित होते.