रॉकेलसाठीचे अनुदान शिधापत्रिकाधारकांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी संगमनेरमध्ये सुरू झाली आहे. त्यासाठी गावोगावच्या शिधापत्रिकाधारकांच्या सोयीच्या राष्ट्रीयीकृत बँकात विनामूल्य खाते उघडण्याची मोहीम तालुक्यात हाती घेण्यात आली आहे.
रॉकेल मिळण्यास पात्र असलेल्या शिधापत्रिकाधारकांना घरातील महिला सदस्याच्या नावाने राष्ट्रीयीकृत बँकेत बचत खाते उघडणे आवश्यक आहे. या खात्यावर रॉकेल अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाणार आहे. तालुक्यातील प्रत्येक गावाच्या सोयीनुसार बँकेत खाते उघडण्याची मोहीम तहसीलदार शरद घोरपडे यांनी हाती घेतली आहे. त्यासाठीचे तारीखनिहाय नियोजन करण्यात आले आहे. ठरलेल्या दिवशी बँकेचे अधिकारी त्या गावात जाऊन शिधापत्रिकाधारकांचे बँकेत विनामूल्य खाते उघडतील. दि. ३१ जुलैपर्यत ही मोहीम सुरू राहणार आहे.
कुटुंबप्रमुखाचे जर राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असेल तर त्याच खात्यावर पत्नीचे नाव समाविष्ट करून संयुक्त खाते करता येईल. जर पत्नी हयात नसेल तर कुटुंबातील वरिष्ठ महिलेच्या नावाने खाते उघडावे लागेल. शिधापत्रिकाधारकांनी दोन छायाचित्रे, रहिवासी पुरावा, निवडणूक ओळखपत्र अथवा आधारकार्ड सोबत आणून नियोजित दिवशी आपले खाते उघडून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.