रमेश महाले यांना राज्य शासनाचा पुरस्कार
राज्य शासनाचा मराठीतील उत्कृष्ट बाल वाडमयाचा यदुनाथ थत्ते पुरस्कार नाशिक येथील निवृत्त मुख्याध्यापक रमेश महाले यांना जाहीर झाला आहे. ‘चला अंतराळात’ या पुस्तकासाठी महाले यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. महाले यांची बाल वाडमय व विज्ञान विषयावरील एकूण १०० पुस्तके प्रसिध्द झाली आहेत. यापूर्वी त्यांच्या ‘विज्ञान’ आणि ‘अंतराळातील स्टेशन’ या पुस्तकांनाही शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत.
रचना विद्यालयाचे यश
नाशिक येथील गुरू गोविंदसिंग फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारीत ‘प्रेरणा’ या प्रदर्शनात रचना माध्यमिक विद्यालयाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. नववीतील श्रेयस कुलकर्णी, उन्मेष पोतदार यांनी ‘वायरलेस पॉवर ट्रान्सफर’ हा प्रकल्प सादर केला होता. बक्षिसाचे स्वरूप २१ हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक असे आहे.
ज्या भागात विद्युत ऊर्जा उपलब्ध होऊ शकत नाही अशा हिमालय, वाळवंट या ठिकाणी सौर उर्जेचे रुपांतर विद्युतमध्ये करून या उपकरणाच्या मदतीने भ्रमणध्वनी कार्यान्वित करणे, दिवे लावणे आदी उपयोग करता येऊ शकतात. प्रकल्पासाठी मुख्याध्यापिका सुचेता येवला, उपमुख्याध्यापिका संगीता टाकळकर, पर्यवेक्षक सुनील गायकवाड आदींचे मार्गदर्शन लाभले.
श्वेता शार्दुलचे यश
नाशिक येथील होरायझन अकॅडमी येथील श्वेता शार्दुल हिने बंगलोर येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. तिला शंकर मादगुंडी व घनश्याम कुंवर यांचे मार्गदर्शन लाभले.
शर्वरी तांबटचा गौरव
नाशिक येथील विस्डम हाय या शाळेची विद्यार्थिनी शर्वरी तांबट हिने वक्त्याच्या आवाजानुसार ध्वनीची पातळी निश्चित करण्या संदर्भात संशोधन केले आहे. ‘मायक्रोफोन दॅट अ‍ॅडजस्ट व्हॉल्यूम अ‍ॅकॉर्डिग युजर्स व्हाईस’ या संशोधनात मायक्रोफोनमध्ये आपोआप नियंत्रण होईल, याचा वापर करण्यात आला आहे. अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट संस्थेच्या प्रदर्शनात हा प्रकल्प मांडण्यात आला होता. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते शर्वरीचा गौरवही करण्यात आला.
अक्षय भावसारचे यश
नाशिक येथील आय. आय. टी. अकॅडमीत शिकत असलेल्या अक्षय भावसारने मुंबई येथे आयोजित प्रदर्शनात प्रकल्प सादर करत चौथा क्रमांक मिळविला. अक्षयने ‘मेटलॅर्जी’ विषयावर प्रकल्प सादर केला असून ‘फॅब्रीकेशन ऑफ अ‍ॅल्युमिन होलो गॅ्रन्युएल्स’ हे त्याने प्रकल्पातून मांडले आहे. त्याला या प्रकल्पासाठी पुरस्कार मिळाला आहे.