बुलढाणा शहर व परिसरात शुक्रवारी दुपारनंतर मेघगर्जना व विजेच्या कडकडाटांसह बेमोसमी पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर सायंकाळपर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. दोन दिवसापूर्वी वादळी पावसाने लोणार तालुक्याला झोडपले होते. त्यानंतर शुक्रवारी बुलढाण्यात पावसाचे आगमन झाले.
गेल्या चार दिवसांपासून बुलढाणा शहर व जिल्ह्य़ात ढगाळ वातावरण झाले आहे. वातावरणातील गारठाही वाढला आहे. या पावसाने यात आणखी वाढ झाली. अकाली पावसामुळे उभ्या रब्बी शेतपिकासह भाजीपाला व फळशेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे. पावसामुळे आंबा मोहोर गळून पडला. गहू व हरभऱ्याचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजीपाला व फळबागांचेही नुकसान झाले आहे. सध्या तूर काढणीचा हंगाम आहे. पावसामुळे त्यात व्यत्यय निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. तूरपिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चार दिवसाच्या ढगाळ वातावरणामुळे साथीच्या व संसर्गजन्य रोगात वाढ झाली आहे.