कवी कमलाकर देसले यांच्या गझलेत प्रेम, त्याग, मानवता, संघर्ष या भाव-भावनांसोबतच संत व सूफी परंपरेच्या तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब उमटते. वृत्ताची शिस्त पाळतानाच खयालांचे सौंदर्य सांभाळण्यात त्यांचा हातखंडा असल्याने गझल आशयपूर्ण व सशक्त होत जाते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले. तालुक्यातील झोडगे येथे कवी कमलाकर देसले लिखित ‘काळाचा जरासा घास’ या गझलसंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नीळकंठ देसले होते.
देसले यांनी ५१ व्या वर्षांत पदार्पण केल्याचे औचित्य साधून त्यांचा मित्र परिवार व नाशिकचे कुसुमाग्रज प्रकाशन यांच्या वतीने त्यांनी लिहिलेल्या ५१ गझल या संग्रहात आहेत. प्रसिद्ध गझलकार भीमराव पांचाळे यांच्या हस्ते या गझलसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी कवी खलील मोमीन, शिक्षणाधिकारी प्रकाश आंधळे, कवी प्रकाश होळकर, डॉ. तुषार चांदवडकर, ज्येष्ठ विधिज्ञ आय. जी. पाटील, अमोल बागूल, मोतीलाल पाटील, सरपंच भैयासाहेब देसले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक विजय पाटील यांनी केले. जगदीश देवपूरकर व किशोर बळी यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी पांचाळे यांच्या गझलगायनाची मैफलही झाली.