महापालिकेच्या घरकुल घोटाळ्यातील प्रमुख संशयित आमदार सुरेश जैन यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीतून बाहेर पडण्याची शक्यता धूसर झाली आहे.
जैन यांना १० मार्च २०१२ रोजी घरकुल घोटाळ्यात अटक करण्यात आली. तत्पूर्वी माजी महापौर प्रदीप रायसोनी यांच्यासह राजा मयूर व जगन्नाथ वाणी यांना २७ जानेवारी रोजी अटक झाली होती. हे चौथे संशयित अटक झाल्यापासून न्यायालयीन कोठडीतच असून त्यांनी वेळोवेळी केलेले जामीन अर्ज जिल्हा, उच्च व सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. आपल्या वयाचा तसेच आपल्यावर होत असलेल्या उपचारांची दखल घेऊन जामीन मिळण्यासाठी विनंती अर्ज सुरेश जैन यांच्या सोबतच मयूर आणि वाणी यांनी सर्वोच्च न्यायालयात केला होता. ७ ऑक्टोबर रोजी त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने पुन्हा त्यांचा जामीन फेटाळला.
जळगाव विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळा निवडून आलेले ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री सुरेश जैन यांना घरकुल गैरव्यवहारप्रकरणी १० मार्च २०१२ च्या रात्री अटक करण्यात आल्यानंतर नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. १९ मार्च रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. न्यायालयीन कोठडीत असतानाच २२ मार्च रोजी त्यांना उपचारार्थ मुंबईत हलविण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत जैन हे न्यायालयीन कोठडीत परंतु विविध उपचारांच्या निमित्ताने रुग्णालयात आहेत.
 २ जुलै २०१२ आणि ३० जुलै २०१२ रोजी जिल्हा न्यायालयाने, तर १३ सप्टेंबर २०१२ रोजी औरंगाबाद खंडपीठाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर १९ ऑक्टोबर २०१२ रोजी सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना जामीन नाकारला. औरंगाबाद खंडपीठाने १७ डिसेंबर २०१२ रोजी आणि सर्वोच्च न्यायालयाने ६ फेब्रुवारी २०१३ रोजी त्यांचा जामीन पुन्हा फेटाळल्याने त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता वाढीस लागली. ६ मे २०१३ आणि ७ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने जैन यांना जामीन नाकारला. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेत महापालिका निवडणुकीपूर्वी जिल्हा न्यायालयात अर्ज केला. तोही फेटाळला गेल्यानंतर उच्च न्यायालयाने व आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने पाचव्यांदा त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे सुरेश जैन यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.