कुर्ला येथे रेल्वे स्थानकाच्या खालून जाणाऱ्या भुयारी मार्गाचे गूढ कायम राहिले आहे. हा भुयारी मार्ग नेमका केवळ पादचाऱ्यांसाठी आहे की रिक्षा-टॅक्सी सारख्या हलक्या वाहनांसाठीही आहे हे अद्याप निश्चित झालेले नाहीच; पण रेल्वेने आपले काम पूर्ण केल्यानंतरही पालिकेने परवानगी नाकारल्यामुळे आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर मनोहर जोशी यांनी हा मार्ग सुरू होणारच, असे म्हणत पालिकेने तात्काळ काम सुरू करावे, अशी मागणी केली आहे.
माजी लोकसभाध्यक्ष आणि तत्कालीन स्थानिक खासदार मनोहर जोशी यांनी कुर्ला पूर्व-पश्चिम भागांना जोडणाऱ्या भुयारी मार्गाची योजना २००३ मध्ये जाहीर केली होती. त्यावेळी आखण्यात आलेला प्रकल्प दोनवेळा बदलण्यात आला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने कुर्ला रेल्वे स्थानकाखालून जाणारा १२० मीटर लांब आणि सुमारे ९ मीटर रुंदीचा बोगदा तयार केला. मात्र त्या बोगद्यामध्ये सतत पाणी झिरपत असून वायुविजनाची कोणतीही सुविधा नसल्याने हा बोगदा वाहतुकीस योग्य नसल्याचा अहवाल व्हीजेटीआय संस्थेने दिला होता. हा अहवाल पालिकेच्या एका अधिकाऱ्याने रेल्वे आणि पालिका यांच्या संयुक्त बैठकीत सादर केल्यावर पालिकेने हा भुयारी मार्ग होणार नाही असे स्पष्ट केले आणि काम बंद पडले. मात्र हा अहवाल लेखी स्वरूपात किंवा अधिकृत स्वरूपात नसल्यामुळे त्याची ग्राह्यता किती असा प्रश्न रेल्वेने उपस्थित केला होता. मात्र त्यावर अद्यापही कोणीही स्पष्टीकरण केलेले नाही. २००३ मध्ये सुरू झालेले काम १० वर्षांंनंतरही ‘जैसे थे’च आहे.
दरम्यान, हा भुयारी मार्ग हलक्या वाहनांसाठी असेल असे तत्कालीन खासदार मनोहर जोशी यांनी कामाच्या सुरुवातीस सांगितले होते. त्यानंतर भुयारी मार्ग पूर्व आणि पश्चिमेस कुठे उघडणार आणि तेथील बांधकामे हटविण्याबाबत पालिका, बेस्ट प्रशासनाने कोणतीही भूमिका घेतली नाही. दोनवेळा जागा बदललेला हा भुयारी मार्ग २०१२ मध्ये पादचाऱ्यांसाठीच खुला होणार असे सांगण्यात येत होते. मात्र रविवारी मनोहर जोशी यांनी पुन्हा कुर्ला येथे भेट दिली आणि हा भुयारी मार्ग लवकरच हलक्या वाहनांसाठी खुला होईल, असे स्पष्ट केले. सात ते आठ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेला हा भुयारी मार्ग सुरू होणार का आणि तो नेमका कोणासाठी हे गूढ अजूनही उलगडलेले नाही. मात्र पालिका प्रशासन आणि स्थानिक राजकारण यांच्यातील मतभेदांमुळे कुर्ला पूर्व आणि पश्चिम येथील रहिवाशांना शीव किंवा घाटकोपर येथे वळसा घालूनच दुसऱ्या बाजूस जाण्याची कसरत करावी लागत आहे.