शहरातील हैदराबाद रस्त्यावर तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. मात्र हत्याकांडामागचे कारण अद्यापि स्पष्ट झाले नाही.
सफन बाबुलाल तांबोळी (वय 38, रा. कुमारस्वामी नगर, शेळगी, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गेल्या 12 मे रोजी मध्यरात्री उशिरा हैदराबाद रस्त्यावर मुळेगाव फाटयाजवळ गुंड व देवकर (दोघे रा.सुरतगाव, ता. तुळजापूर) या दोघांचा अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरुन निर्घृण खून केला होता. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली होती. परंतु पोलिसांनी प्रयत्न करुनही गुन्ह्याची उकल होत नव्हती. दरम्यान काही साक्षीदारांनी सांगितलेल्या वर्णनावरुन संशयिताचे रेखाचित्र तयार करण्यात आले होते. या गुन्ह्याचा शास्त्रोक्त पध्दतीने चौकशी केली असता मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेने पुण्याकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या एका संशयिताला जेलरोड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे नाव सफन बाबुलाल तांबोळी असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसी खाक्या दाखविताच त्याने या गुन्ह्याचे धागेदोरे पुढे आणले. तपासाची दिशा बदलण्यासाठी त्याने खोटी नावे सांगितल्याचे कबूल केले. दोन्ही मृतांकडील काही वस्तु स्वतकडे ठेवून नंतर सातारा येथील एका मालमोटार चालकाला विकल्याचे कबूल केले. संशयित तांबोळी पुढील तपासाठी एमआयडीसी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दबडे, सहायक निरीक्षक तय्यब मुजावर यांच्या पथकाने ही कारवाई केली.