न्यू इंग्लिश हायस्कूल महाल शाखेतर्फे बाल स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छता अभियान मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचा प्रारंभ महापौर प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, अजय धाक्रस, श्रीपाद रिसालदार, मुख्याध्यापक खंडाईत यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. मिरवणुकीतील विद्यार्थ्यांनी मार्गातील कचरा उचलून व स्वच्छतेसंबंधी घोषणा देऊन नागरिकांना संदेश दिला. मिरवणुकीत घोष पथक, लेझीम, एनसीसी पथक व शाळेतील १२०० विद्यार्थी हातात स्वच्छतेचा संदेश देणारे फलक घेऊन सहभागी झाले होते. रॅली यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक चोरघडे, पिंपळकर, पिंपळखुटे आदी शिक्षकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन मनीष तितरमारे यांनी तर मुख्याध्यापक हरीश खंडाईत यांनी आभार मानले.
प्रबोधन कॉन्व्हेंटमध्ये मिरवणूक
प्रबोधन कॉनव्हेंटमध्ये भारत स्वच्छता अभियान व बालकदिनानिमित्त शाळा व लगतच्या संपूर्ण परिसराची साफसफाई करण्यात आली. नर्सरीपासून तर कनिष्ठ महाविद्यालयापर्यंतच्या विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक यात सहभागी झाले होते. स्वच्छता मोहिमेनंतर मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत विविध घोषवाक्याचे फलक तयार करून स्वच्छतेबाबत घोषणा देऊन मिरवणूक काढली. परिसरातील नागरिकांनी या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वच्छतेबाबत सतर्क व जागरूक राहण्यासंबंधी पत्रके देखील शाळेच्यावतीने नागरिकांना वाटण्यात आली.
‘बाल स्वच्छता अभियान’
मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतन शाळेच्या मैदानात बालक दिनानिमित्त बालस्वच्छता अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास शाळेतील स्काऊट/ गाईडच्या विद्यार्थ्यांनी शाळेचा संपूर्ण परिसर तसेच शाळेच्या आजूबाजूचा परिसर झाडून स्वच्छ केला. तसेच विद्यार्थ्यांनी हात धुवून वैयक्तिक शारीरिक स्वच्छता केली. हा कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापक मधुसूदन मुडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेणयत आला. हा स्काऊट, माला चिलबुले, माया मेश्राम, गणेश राठोड, मिलिंद शंभरकर, अमित मुदगल, कुणाल माहुरे सुधा भुते तसेच संध्या चौधरी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
चिन्मय मिशनद्वारा चिन्मय गीता पठन स्पर्धा
चिन्मय मिशन नागपूरद्वारे ‘चिन्मय गीता पठन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘श्रीमद्भगवद गीतेचा १४वा अध्याय’(गुणत्रय विभाग योग) हा स्पर्धेला असून या स्पर्धेत केजी १ ते १० वी पर्यंतचे मुले-मुली भाग घेऊ शकतात. स्पर्धेची प्राथमिक फेरी २९ व २० नोव्हेंबरला ‘फुलवारी’ त्रिमूर्तीनगर येथे होणार आहे. अंतिम फेरी ६ डिसेंबरला होणार आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ७ डिसेंबरला दुपारी ५ वाजता जिजामाता सभागृह, शंकरनगर येथे आयोजित आहे.
राष्ट्र सेवा विद्यालयात बालक दिन साजरा
राष्ट्र सेवा विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांत बालक दिन साजरा करण्यात आला तसेच बाल स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी वर्ग सजावट करून परिसर स्वच्छ केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे महासचिव गुणवंत झाडे यांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन कौतुक केले. स्वच्छतेचे व शिक्षणाचे महत्त्व याबद्दल प्रमुख अतिथी शशिकला माने, तुकाराम लांबाते यांनी विद्यार्थ्यांना बालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका गजभिये यांनी विद्यार्थ्यांना मोठे ध्येय बाळगणयाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी आकाशात फुगे उडवून बालक दिन साजरा केला. कार्यक्रमाचे संचालन भुसारी यांनी केले व आभार नान्हे यांनी मानले.