कल्याण परिसरातील जलतरणपटूंची व्यवस्था व्हावी यासाठी महापालिकेने खासगीकरणाच्या माध्यमातून आधारवाडी येथे उभारलेला जलतरण तलाव सध्या महापालिकेच्या नकारात्मक धोरणामुळे बंद अवस्थेत आहे. या तरणतलावाच्या वापराला महापालिकेकडून पाण्याची जोडणी तसेच वापर परवाना देण्यात आलेला नाही. महापालिकेच्या पुढाकारानेच उभारण्यात आलेल्या या वास्तूला वापर परवाना देताना वेळकाढू धोरण राबविले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून यामुळे कल्याणकरांना सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे.
तरणतलावाच्या उभारणीसाठी सुमारे आठ ते दहा कोटी रुपये ठेकेदाराने खर्च केले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेने मागील आठ वर्षांपूर्वी कल्याण स्पोर्ट्सचे क्लबचे ठेकेदार डॉ. दिलीप गुडका यांना आधारवाडी वाडेघर येथे ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर तरणतलाव, नौकानयन केंद्र, जलक्रीडा केंद्र, मनोरंजन केंद्र, क्लब हाऊस, शॉपिंग सेंटर, तलाव सुशोभीकरण असे सात प्रकल्प खासगीकरणातून बांधण्यासाठी दिले. पुढील साठ वर्षांसाठी ठेकेदारास या सुविधा चालविण्यास देण्यात येणार आहेत. तब्बल सात वर्षांपूर्वी ठेकेदारास ही कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. कामांचे आदेश दिल्यापासून अठरा महिन्यांत ही कामे पूर्ण होणे आवश्यक होते. या सर्व उपक्रमांसाठी महापालिकेने ठेकेदाराला कराराप्रमाणे प्रत्यक्ष ५८ हजार चौरस मीटर जागा देणे आवश्यक होते. प्रत्यक्षात ३८ हजार १३१ चौरस मीटर जागा हस्तांतरित करीत असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. असे असले तरी या जागेपैकी सुमारे १६ हजार चौरस मीटर जागाच ठेकेदाराला देण्यात आली आहे, अशी माहिती पुढे येत आहे. काही जागा महापालिकेच्या ताब्यात असतानाही त्या हस्तांतरित करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे ठेकेदाराने सांगितले. ही जागा प्रत्यक्षात ताब्यात घेताना ठेकेदाराला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या सुविधा महापालिकेने उपलव्ध करून देणे आवश्यक होते. त्या उपलब्ध करून न दिल्याने उपक्रमाची सुरुवात करण्यास वेळ दवडला जात असल्याच्या तक्रारी आहेत. जमीन अकृषीक करून घेणे तसेच इतर कामांसाठी विलंब झाला, असे ठेकेदार डॉ. दिलीप गुडका यांनी सांगितले.
कल्याणमधील नागरिकांना तरणतलाव, जलक्रीडा केंद्र लवकर उपलब्ध व्हावे म्हणून ही कामे गेल्या दोन वर्षांपूर्वी प्राधान्याने पूर्ण करण्यात आली आहेत. सदस्य नोंदणी सुरू करून महापालिकेला उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल, असा या मागील उद्देश होता. दरम्यान, महापालिका आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी कराराच्या अटीशर्तीचे उल्लंघन केले म्हणून हा ठेकाच रद्द का करू नये, अशी नोटीस ठेकेदाराला पाठवली आहे. जमीन महापालिकेची आहे, तसेच करारही महापालिकेसोबत झाले आहे. मग, या प्रकल्पाचा ठेका रद्द कसा केला जाऊ शकतो, असा सवाल आता डॉ. गुडका यांनी उपस्थित केला आहे.

वापर परवानाही रखडला   
गेल्या दोन वर्षांत तरणतलावाचा वापर सुरू करता यावा, यासाठी वापर परवाना, पाण्याच्या नळजोडण्या दिल्या जाव्यात यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना २५ ते ३० स्मरणपत्रे पाठविण्यात आली आहेत. यापैकी एकाही पत्राचे उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात येत नाही. तरणतलाव सदस्य नोंदणीसाठी दर ठरवण्यात येत नाहीत. तरणतलावाचा वापर नाही. त्यात पाणी नाही. त्यामुळे तरणतलावातील सगळी यंत्रणा खराब होत आहे, अशी माहिती पुढे आली आहे. या तरणतलावाच्या खुच्र्या गंजल्या आहेत. तलावात महापालिकेकडून पाणी उपलब्ध करून देण्यात येत नसल्याने तलावातील यंत्रणा गंजू लागली आहे. संपूर्ण यंत्रणा खराब होऊ नये म्हणून स्व खर्चाने खासगी टँकरने पाणी आणून ते तलावात ओतले जात आहे, असे डॉ. गुडका यांनी सांगितले.

अटीशर्ती पाळा
महापालिकेचे शहर अभियंता पाटीलबुवा कारभारी उगले यांच्याकडे यासंबंधी विचारणा केली असता त्यांनी ‘कल्याण स्पोर्ट्स क्लबचा ठेकेदार कराराप्रमाणे काम करीत नाही’, असे स्पष्ट केले. त्यामुळे त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. कराराचे पालन होत नसल्यामुळे महापालिका त्यांना उर्वरित जमिनीचा ताबा देणे तसेच इतर परवानग्या देण्याची प्रक्रिया पूर्ण करीत नाही. ठेकेदाराने प्रथम करारातील अटीशर्तीची पूर्णता करावी. त्यानंतर त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल, असे सांगितले.