शहरात असलेल्या जुन्या जीर्ण झालेल्या इमारतीत नागरिक राहत असून अशा जीर्ण इमारतींची यादी तयार करण्यासाठी महापालिको कर्मचारी फारसे सक्रिय  असल्याचे दिसून येत नाही. जीर्ण इमारती, घरे कोसळल्यानंतरच अग्निक्षमन विभागाच्या पथकाकडून महापालिकेच्या यादीत अशा इमारतींची नोंद नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अशा इमारती वा जीर्ण घरात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी महापालिकेला एखादी दुर्घटना घडल्याशिवाय जाग येणार नाही, अशी स्थिती सध्या आहे. मुख्य म्हणजे अशा इमारती, जीर्ण घरांची यादी देखील अग्निशमन विभागाकडे उपलब्ध नसल्याचे दिसून येते.
इतवारीतील एका जीर्ण घराची भिंत कोसळल्यावर जीर्ण इमारतींची यादीच अग्निशमन विभागाकडे उपलब्ध नव्हती. अग्निशमन विभागाच्या पथकाने फक्त मलबा काढण्याचे काम केले, पण इमारत पडल्याची माहिती घटना घडल्यानंतर झोनल कार्यालयाकडून मिळाली नाही. अशा जीर्ण इमारती इतवारीत भागातच नव्हे तर गांधीबाग, मस्कासाथ, गोळीबार चौक, पाचपावली, सक्करदरा, हंसापुरी, इमामवाडा, गोकुळपेठ, नाईक तलाव, आदी भागातही मोठय़ा प्रमाणात आहेत.
अशा इमारती, घरे यांची माहिती घेऊन ती महापालिकेच्या झोनल कार्यालयांना ही माहिती गोळा करून तशी यादी पावसाळ्यापूर्वीच तयार करून ठेवावी. अशी तयार यादी अग्निशमन विभागाकडे आणि अतिक्रमण हटाव विभागाकडे ती यादी उपलब्ध करून द्यावी, असे सुचविण्यात आले आहे. तीन वर्षांपूर्वी नटराज सिनेमागृहाजवळ अशीच जीर्ण इमारत कोसळून त्याखाली दबून वृद्धेचा मृत्यू झाला होता, पण त्या इमारतीची नोंद महापालिकेच्या यादीत नव्हती. याचाच अर्थ जीर्ण इमारतीचा शोध घेण्यास महापालिकेचे कर्मचारी उदासीन आहेत, असा काढण्यात येत आहे.