इंदिरा आवास योजनेतून निराधार कुटुंबाला मंजूर झालेल्या घरकुलाच्या अनुदानाची रक्कम देण्यासाठी २५ हजारांची लाच घेताना मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदरच्या सरपंचासह ग्रामसेवक व लिपिकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. यात सरपंच व लिपिक या दोघांना जागेवरच अटक करण्यात आली तर ग्रामसेवक पळून जाण्यात यशस्वी ठरला.
सरपंच नवनाथ अनुसे, ग्रामसेवक गोपीचंद गवळी व लिपिक महमद पठाण अशी या लाच प्रकरणातील संशयित आरोपींची नावे आहेत. टाकळी सिकंदर येथील राजकुमार ज्ञानदेव जाधव यास गेल्या वर्षी शासनाकडून इंदिरा आवास योजनेखाली घरकुल मंजूर झाले होते. त्यासाठी ६८ हजार ५०० रुपयांचे अनुदान मिळणार होते. त्यापैकी २४ हजारांचा पहिला हप्ता प्राप्त झाला व उर्वरित ४४ हजारांचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी सरपंच अनुसे व ग्रामसेवक गवळी यांनी त्यास २५ हजारांची लाच मागितली. याबाबत जाधव याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयात फिर्याद नोंदविली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक गणेश जवादवाड व पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या पथकाने टाकळी सिकंदर येथे सापळा लावून लिपिक पठाण यास लाच घेताना पकडले. मात्र या वेळी ग्रामसेवकाने धूम ठोकून पलायन केले. सरपंच अनुसे यास ताब्यात घेण्यात आले. मोहोळ पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.