ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी प्रमाणित बियाण्यांचा वापर केला आहे, अशा प्रक्षेत्रातून प्राप्त सोयाबीन बियाणे खरीप २०१४ हंगामासाठी निवडावे. यंदाच्या खरीप २०१४ च्या हंगामात सायोबीन बियाण्याच्या मर्यादित उपलब्धतेमुळे, शेतकऱ्यांनी महाबीज बियाणे व घरचे बियाणे वापरताना काळजी घ्यावी आणि याबाबत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असा सल्ला महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शालीग्राम वानखेडे यांनी दिला.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा ३८ वा वर्धापन दिन अकोला येथील महाबीज भवनात नुकताच सादरा करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ, वानखेडे बोलत होते. महाबीजरूपी रोपटय़ाचा आज वटवृक्ष झाला आहे. स्थापनेपासूनच महाबीज शेतकऱ्यांना आवश्यक ते बियाणे योग्य दरात उपलब्ध करून देण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे, असे ते म्हणाले.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून महामंडळाने राज्यातील विक्रेत्यांना कुंभारी येथील सोयाबीन बियाण्याच्या क्षेत्र चाचणी लागवड क्षेत्रास भेटीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात राज्याच्या विविध जिल्ह्य़ांतून आलेल्या ७५ विक्रेत्यांचा समावेश होता. बियाणे वितरणापूर्वी महामंडळामार्फत प्रत्येक टप्प्यावर घेणाऱ्या येणाऱ्या गुणवत्ता विषयक काळजीबाबत माहिती देण्यात आली.
महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शालीग्राम वानखेडे यांनी उपस्थित विक्रेते व अधिकाऱ्यांना क्षेत्र भेटीनंतर मार्गदर्शन केले. त्यांनी विक्रेत्यांशी सुसंवाद साधून अडचणी जाणून घेऊन त्यावर सकारात्मक तोडगा निश्चितच महामंडळाद्वारे काढण्यात येणार असल्याचे सांगितले.
सार्वजनिक क्षेत्रातील बीटी कपाशी बियाण्याबाबत संशोधन सुरू करण्यात आले असून महामंडळाने कृषी विद्यापीठासोबत नुकताच करार केला असल्याचे डॉ. वानखेडे म्हणाले. कार्यक्रमाला महाराष्ट्र कृषी व्यावसायिक संघाचे उपाध्यक्ष मामडे, महाबीज विक्रेते, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक व मुख्यालयातील विभाग प्रमुख उपस्थित होते. विपणन महाव्यवस्थापक नाके यांनी प्रास्ताविक तर गावंडे यांनी संचालन केले. उत्पादन महाव्यवस्थापक सुरेश पुंडकर यांनी आभार मानले.