ग्रामीण भागात वाडी, वस्त्यांवर पडणारे दरोडे आणि गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीकोनातून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या सातव्या वर्षांत नाशिक परिक्षेत्रात ३,९५३ ग्रामसुरक्षा दलांची स्थापना करण्यात आली आहे. त्यात गतवर्षीप्रमाणे यंदाही जळगावने आघाडी घेतली असून धुळे जिल्हा पिछाडीवर पडल्याचे दिसून येते. गतवर्षीच्या तुलनेत या मोहिमेत सहभागी झालेल्या गावांची संख्या काहीशी कमी झाली असल्याने ग्रामसुरक्षा दलाची संख्या ६८ ने घसरली आहे.
२०१३-१४ या वर्षांत परिक्षेत्रातील अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदुरबार आणि नाशिक ग्रामीण पाचही जिल्हे मिळून एकूण तीन हजार ९५३ ग्रामसुरक्षा दल स्थापन झाले आहेत. गतवर्षी ही संख्या ४, ०२१ होती. गावपातळीवरील वाद सामोपचाराने मिटविणे आणि नव्याने तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपक्रम राबविणे असे या मोहिमेचे स्वरूप आहे. त्या अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करणे अंतर्भूत आहे. या दलामुळे पोलीस यंत्रणेला अतिरिक्त कुमक उपलब्ध झाली. तंटामुक्त गाव मोहिमेच्या सातव्या वर्षांत म्हणजेच २०१३-१४ मध्ये नाशिक परिक्षेत्रात जळगाव जिल्ह्यातील २९ पोलीस ठाण्यांतर्गत सर्वाधिक १,१४८ ग्रामसुरक्षा दलांची स्थापना झाली आहे. त्यानंतर क्रमांक आहे, तो अहमदनगर जिल्ह्याचा. तेथील २५ पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत १,०२४ ग्रामसुरक्षा दल स्थापन झाले. नाशिक ग्रामीणच्या ३५ पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत ८८५ ग्रामसुरक्षा दल स्थापन झाले. नंदुरबार जिल्ह्यात १० पोलीस ठाण्यांतर्गत ५५२ तर धुळे जिल्ह्यात १५ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात ३४४ ग्रामसुरक्षा दलांची स्थापना झाली आहे. या आकडेवारीवर नजर टाकल्यास दलाच्या स्थापनेत धुळे जिल्हा मागे पडल्याचे दिसून येते तर आदिवासीबहुल नंदुरबारनेही धुळ्यावर मात केली आहे.
ग्रामीण भागात चोरी व दरोडय़ाचे प्रकार रोखण्यासाठी या दलाच्या सदस्यांकडून गस्त घातली जाते. याद्वारे स्थानिक पातळीवर सुरक्षा व्यवस्थेची फळी उभारली गेल्याने पोलीस यंत्रणेवरील कामाचा ताण काहीअंशी हलका झाला आहे. रात्रीच्या सुमारास गस्त घालून दरोडय़ांना अटकाव करण्याची जबाबदारी या दलावर सोपविण्यात आली आहे. पोलीस ठाण्यांकडून दलाच्या सदस्यांना खास प्रशिक्षण व गणवेशही उपलब्ध करून दिला जातो. या दलाच्या मदतीने गावातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्यास पोलीस यंत्रणेला अतिरिक्त बळ उपलब्ध झाले. तसेच नैसर्गिक आपत्ती वा आपत्कालीन प्रसंगी हे दल स्थानिक पातळीवर सक्रियपणे कार्यरत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.