आंतरराष्ट्रीय पिझ्झा, बर्गरला देशी तडका!

आंतरराष्ट्रीय फूड साखळीच्या रेस्टॉरन्टमध्ये जाऊन पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राइज, पास्ता, कटलेट, आलू टिक्का, कॉर्न स्पॅनिश पॅट्टी खात या पदार्थाच्या चवीचे कौतुक करण्यात आपण सर्वच जण मग्न असतो.

आंतरराष्ट्रीय फूड साखळीच्या रेस्टॉरन्टमध्ये जाऊन पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राइज, पास्ता, कटलेट, आलू टिक्का, कॉर्न स्पॅनिश पॅट्टी खात या पदार्थाच्या चवीचे कौतुक करण्यात आपण सर्वच जण मग्न असतो. या खाद्यपदार्थाची सेवा देणाऱ्या कंपन्या जरी परदेशातील असल्या तरी त्यांच्या पदार्थामध्ये वापरला जाणारा मसाला मात्र अस्सल भारतीय आहे. कल्याणमधील ‘टेस्टी फुडी नेटवर्क’ या कंपनीत तयार होणाऱ्या मसाल्यानेच या पिझ्झा, बर्गरला खरी चव येते. विशेष म्हणजे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातून स्वेच्छानिवृत्ती घेऊन कल्याणमधील दोन तंत्रज्ञांनी हा उद्योग सुरू केला. आजच्या घडीला या कंपनीतून बनलेल्या मसाल्यापासून देशभरात महिन्याला सुमारे पाच लाखांहून अधिक बटाटेवडे तळले जातात. 

– कल्याणच्या शिवाजी चौकातील बदलापूरकर चाळीमध्ये राहणारे रवींद्र दुर्वे आणि त्याच परिसरात लहानपणी वास्तव्यास असलेले नीलेश ओझरकर यांच्या रोजगार कारकिर्दीची सुरुवात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातून झाली. दुर्वे यांनी नाशिकमध्ये संगणक अभियंता म्हणून पदवी मिळवली, तर नीलेश ओझरकर यांनी पुण्यामध्ये व्यवस्थापनाची पदवी घेतली. त्यानंतर दोघांनी भागीदारीत संगणकाचा व्यवसाय सुरू केला. पुढे खासगी कंपनीत नोकरी मिळाल्यानंतर हे दोघे विभक्त झाले. मात्र, काही वर्षांनंतर दुर्वे हे अमेरिकेतील अटलान्सामधून नोकरी करून परतले आणि भागीदारीत स्वत:चा व्यवसाय करण्याच्या
– दोघांच्या इच्छेने पुन्हा डोके वर काढले. मात्र, यावेळी संगणक क्षेत्रात न जाता या दोघांनी स्वत:चा मसाला उद्योग सुरू केला. सुरुवातीला राहत्या घरामध्येच बटाटावडय़ाचा तयार मसाला तयार करण्याचा उद्योग सुरू झाला. त्याबरोबरीने कर्जत येथील एका महाविद्यालयाच्या कँटीनचे कंत्राट घेऊन तेथे व्यवसायाला सुरुवात झाली. येथील विद्यार्थ्यांना पिझ्झा, बर्गर, पास्ता यांचा पुरवठा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी करार झाला. घरामध्ये तयार होणाऱ्या मसाल्यांसाठी बाजारपेठ मिळवण्यासाठी रवींद्र आणि नीलेश यांना मोठी मेहनत करावी लागली. अनेक वडापाववाल्यांना नमुना म्हणून मोफत तयार मसाला देण्यापासून मार्केटिंग सुरू केले. त्याच दरम्यान आंतरराष्ट्रीय कंपन्यांना मसाल्यांचे पदार्थ पुरवणाऱ्या कंपनीलाही नमुन्यांची पाकिटे देण्यास सुरुवात केली. दोन वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांना या कंपनीने मसाले पुरवण्याची पहिली ऑर्डर मिळाली. आयटी क्षेत्रातील नियोजनाची शिस्त या दोघांनी या व्यवसायातही राखली. मसाल्यासाठी आवश्यक घटकांची चाचणी करून त्यांचे निकष ठरवण्यात आले. त्यातील सर्व घटकांच्या शास्त्रोक्त विवरणाची माहितीही घेण्यात आली. त्यासाठी आवश्यक शास्त्रोक्त चाचण्या घेण्यात आल्या. पदार्थाची ठरलेली चव, त्यातील घटक यांचे प्रमाण कायम राहील याकडे कटाक्ष देण्यात आला. शिवाय आलेल्या मागणीप्रमाणे वेळेच्या आधी त्याचा पुरवठा करण्याकडेही विशेष लक्ष देऊन अवघ्या चार वर्षांमध्ये टेस्टी फूडने आपली ओळख निर्माण केल्याचे दुर्वे यांनी सांगितले.

सध्या टेस्टी फुडीचे महिन्याकाठीचे उत्पन्न १५ टनपर्यंतचे असून लवकरच याचा विस्तार करून तो १०० टनांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यूके, ऑस्ट्रेलिया या देशांबरोबरीने मध्य प्रदेश, बंगळुरू येथील अनेक फूड साखळ्यांसाठी टेस्टी फुडीकडून मसाल्यांचा पुरवठा केला जातो, अशी माहिती नीलेश ओझरकर यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tasty foodie network in kalyan

ताज्या बातम्या