कररूपाने जमा झालेला पैसा देशाचा सर्वागिण विकास व उत्कर्षांसाठी वापरण्यात येत असतो. त्यामुळे कर देणारे व्यापारी व कर घेणारे सरकार यांच्यातील दुवा म्हणून कर सल्लागारांनी समन्वयाने काम करणे अपेक्षित आहे, त्यासाठी जिल्हा टॅक्स बार असोसिएशनने आपल्या कामाची व्याप्ती वाढवावी, असे प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केले.
राज्य सेल्सटॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या ६१ व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हा संघटनेने आयोजित कार्यक्रमात खासदार गांधी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. जिल्हा संघटनेच्या स्टेट बँकेजवळच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्ह्य़ातील कर सल्लागार उपस्थित होते. राहूल चंगेडिया यांनी सर्वाचे स्वागत करून राज्य संघटनेच्या कामाची माहिती दिली. व्यापारी वर्गाच्या अडचणी सरकापर्यंत पोहोचवण्याच्याला संघटना प्राधान्य देत असते, असे त्यांनी सांगितले.
नगरची संघटना ३० वर्षांपूर्वी स्थापन झाली असून संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमही घेतले जातात, अशी माहिती त्यांनी दिली. सर्वश्री डी. के. भांबरे, व्ही. आर. भोजवाणी, एस. व्ही. लोखंडे, रमेश जाधव, अशोक बोरा, विजय मालपाणी, अशोक गांधी, विजय मर्दा यांची भाषणे झाली.