पात्रता परीक्षेविषयी (टीइटी) भावी शिक्षकांच्या मनात असलेली भीती दूर करण्यासाठी विविध संस्था व संघटनांच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असताना आता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही त्यासाठी पुढे सरसावले आहेत. याअंतर्गत खासदार आणि आमदार यांच्याकडून आपआपल्या भागांमध्ये २१ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत तज्ज्ञांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येणार आहे. शासनाने मागील वर्षांपासून शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षणशास्त्र पदविकेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सक्तीची केली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय शिक्षक या पदासाठी पात्र ठरविले जात नसल्याने ही परीक्षा उत्तीर्ण होणे शिक्षकांसाठी अत्यावश्यक ठरले आहे. राष्ट्राचा शैक्षणिक दर्जा सुधारणे हा शासनाचा यामागील मुख्य उद्देश आहे.
सर्व भावी शिक्षकांसाठी या परीक्षेचे अनन्यसाधारण महत्व आहे. मागील वर्षी एकूण सात लाख जणांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल अवघा तीन टक्के लागला होता. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षेविषयी भीती निर्माण झाली. यावर्षी महाराष्ट्रातील तीन लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेचे अर्ज भरले आहेत. मागील वर्षांपेक्षा परीक्षेचा निकाल अधिक लागावा आणि विद्यार्थ्यांच्या मनातील भीती घालवून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यात श्रीज्योती बुक सेलर्ससह इतर काही संस्था आणि लोकप्रतिनिधींनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. श्रीज्योती बुक सेलर्स यांच्या वतीने खास मोफत मार्गदर्शन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. तीनपैकी दोन सत्र झाले असून त्यास सिमा हिरे, बाळासाहेब सानप, डॉ. राहुल आहेर या तीन आमदारांनी उपस्थिती लावली. २३ नोव्हेंबर रोजी या मालिकेतील तिसरे सत्र होणार असून त्यास आ. डॉ. देवयानी फरांदे या उपस्थित राहणार असल्याची माहिती ज्योतिराव खैरनार यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्य़ातून २७ हजार विद्यार्थी या परीक्षेस बसले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असल्याने तालुका स्तरावर खासदार आणि आमदार यांच्या वतीने मोफत मार्गदर्शन व्याख्यानमाला होणार आहे. त्याची सुरूवात २१ नोव्हेंबर रोजी सुरगाणा येथून होणार आहे. खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० नोव्हेंबर रोजी आ. छगन भुजबळ आणि आ. पंकज भुजबळ यांच्या अनुक्रमे येवला व नांदगाव या मतदारासंघातील टीइटी परीक्षार्थीसाठी सकाळी नऊ वाजता व्याख्यान होणार आहे. याच दिवशी सायंकाळी पाच वाजता अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे डॉ. सुधीर तांबे व दुर्गा तांबे यांच्या वतीने व्याख्यान होणार आहे. आ. राहुल आहेर हे चांदवड व देवळा या तालुक्यांसाठी तर, बागलाणमधील परीक्षार्थीसाठी आ. दीपिका चव्हाण यांच्या वतीने व्याख्यान ठेवण्यात येणार आहे.