शास्त्रीय संगीताचे अध्यापन करताना गुरूंनी त्या विषयातील प्राथमिक ज्ञान देण्याची गरज आहे. जुन्या परंपरेत न राहत गुरू आणि शिष्य यांच्यामधील नाते हे एकमेकांना समजून घेणारे असले पाहिजे, असे प्रतिपादन पं. राम देशपांडे यांनी केले.
श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात दोन दिवसीय राष्ट्रीय संगीत परिषदेचे उद्घाटन पं. राम देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशोक गांधी, सचिव सुधीर बाहेती आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहल पाळधीकर उपस्थित होत्या.
गुरू शिष्य परंपरेवर बोलताना डॉ. देशपांडे म्हणाले, गुरू शिष्य परंपरा आजही जुन्या चालीरीती नुसार सुरू असल्यामुळे त्यात बदल करण्याची गरज आहे. गुरूंनी संगीत साधना करायची आणि शिष्याने केवळ ऐकायचे अशी अपेक्षा न ठेवता शिष्यांला शास्त्रीय संगीताच्या दृष्टीने ज्ञान देऊन त्याला परिपक्व केले पाहिजे. प्रत्येक गुरूला शिष्यांकडून अपेक्षा असल्या तरी शिष्याला त्यांच्याकडून अपेक्षा असते, मात्र या अपेक्षा ठेवताना आपण किती सक्षम आहोत याचा विचार शिष्यांनी केला पाहिजे. संगीताचे ज्ञान देताना शिष्याची आवड, त्यांच्या गाण्याची पद्धत याचे अवलोकन केले गेले पाहिजे. गुरू शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीची देण असून ती टिकवली गेली पाहिजे हे जरी खरे असले तरी त्यात काही बदल होणे आवश्यक आहे, असेही देशपांडे म्हणाले.
यावेळी अशोक गांधी आणि सुधीर बाहेती यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य स्नेहल पाळधीकर यांनी केले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने पुरस्कृत दोन दिवसीय या परिषदेत ख्यालगायकी-एक सौंदर्यप्रधान व सृजनशील गायनशैली या विषयावर विचारमंथन होणार आहे. डॉ. मधुभट तेलंग, प्रा. तारा विलायची, डॉ.अपर्णा अग्निहोत्री, डॉ. नारायणराव मंगरूळकर यांच्यासह अनेक संगीततज्ज्ञ मागदर्शन करणार आहेत. विदभातील विविध महाविद्यालयातील संगीताचे प्राध्यापक, कलाकार, विद्यार्थी या परिषदेत सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे संचालन अमृता घुसकुटे यांनी केले.