शाळेत मिळणारे शिक्षण हे मूलगामी असते. शिक्षक तुम्हाला घडविताना तुमच्याच जीवनाचा मूळ पाया सक्षम करण्याचे कार्य करत असतात, असे प्रतिपादन नियोजन मंडळाचे सदस्य तथा पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.
श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, महाराणा प्रताप विद्यालय व गर्ल्स हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा येथील संतोषीमाता सभागृहात झाला. यावेळी डॉ. जाधव बोलत होते. मेळाव्याला दोन हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांसह माजी शिक्षकांची उपस्थिती होती. शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही किती उत्पन्न मिळवतात, यापेक्षा तुमच्या क्षेत्रात तुम्ही किती कमाल उंची गाठताहेत हे महत्वाचे असते. शिक्षण हे कुठेही प्राप्त होत असते. मात्र चांगले शिक्षण फक्त आई-वडील आणि शिक्षकच देऊ शकतात. कठीण गोष्ट सोपी करून सांगणारे शिक्षक असतात. पण सोपी गोष्ट कठीण प्रकारे समजावून सांगणारे प्राध्यापक असतात. अर्थात त्यास काही सन्माननीय अपवाद असतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कुवत लक्षात घेणे आवश्यक असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठला ना कुठला ‘राजहंस’ दडलेला असतो. त्याचा शोध घेवून शिक्षकांनी त्याला चालना दिली पाहिजे, असा सल्ला डॉ. जाधव यांनी दिला. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.