दहा टक्के नवजात बालकांमध्ये हृदयाचे आजार; तज्ज्ञांमध्ये चिंता

नवजात बालकांपैकी दहा टक्के बालकांमध्ये हृदयाशी संबंधित आजार असल्याचे आढळून येत

नवजात बालकांपैकी दहा टक्के बालकांमध्ये हृदयाशी संबंधित आजार असल्याचे आढळून येत असताना त्यादृष्टीने नागपुरात शस्त्रक्रिया व अन्य अत्याधुनिक उपचाराच्या सोयी उपलब्ध नसल्याने बाळरोग तज्ज्ञांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
नुकत्याच जन्मलेल्या बालकांपैकी दहा टक्के बालकांमध्ये हृदयातील रक्त फुफ्फुसापर्यंत नेणाऱ्या धमण्या योग्य जागी नसणे, या धमण्या एकमेकांत गुंतलेल्या असणे, श्वसननलिकेत अडथळे असणे, रक्ताच्या गाठी असणे यांचा प्रामुख्याने समावेश असतो. या विकारामुळे लहान मुलांच्या फुफ्फुसाला रक्ताचा योग्य पुरवठा होत नसल्यामुळे फुफ्फुस निकामी होते. मुलांची वाढ होत नाही व ते एक महिन्याच्या आतच मृत्युमुखी पडते. असे विकार असलेले बालक काळे पडतात. हे लक्षणे दिसताच त्या मुलांवर उपचार करणे आवश्यक आहे. उपचारासाठी ‘ब्रेन डेड’ झालेल्या व्यक्तीच्या धमण्यांची किंवा अन्य अवयवांची गरज भासते. अशा बालकांवर एक महिन्याच्या आतच अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. अवयव प्रत्यारोपण करणे हाच एकमेव उपाय असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही दानदाते मिळाले नाही तर असे बालक एक महिन्यातच दगावण्याची भीती अधिक असते.
अशा बालकांवर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञान नागपुरात सध्या तरी उपलब्ध नाहीत. त्यामुळे अवयव दानदाता मिळाला तरी शस्त्रक्रियेच्या अभावी त्या बालकांतील दोष दूर करता येणे शक्य होत नाही. नवजात बालकांमधील वाढते हृदयाचे आजार बघता नागपुरात असे तंत्रज्ञान उपलब्ध होणे, ही आजच्या काळाची प्रमुख गरज असल्याचे मत बाळरोग तज्ज्ञ संघटना नागपूर शाखेचे अध्यक्ष व बाळरोग तज्ज्ञ डॉ. आर.जी. पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. महिला गर्भवती असताना वेळोवेळी तपासणी केली जात नाही. त्यामुळे शरीरात नेमकी कोणती कमतरता आहे, हे कळत नाही. गैरसमजामुळे पालकही नवजात बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आजाराचे निदान न झाल्यामुळे बालकाचा मृत्यू होतो. गर्भवती महिलेला रक्तदाब, मधुमेह किंवा मूत्रपिंडाचा विकार असणे, गर्भपेशीत दोष असणे, गर्भ पोटात असताना जड वस्तू उचलणे, खूप शारीरिक कष्ट, आहारात योग्य अन्न घटकांचा अभाव, गर्भपात झाला असणे, आदी कारणे नवजातांमध्ये विविध आजार होण्यामागे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवजात बाळ हृदयरोग तज्ज्ञांची गरज
समाजात बाळरोग तज्ज्ञ असले तरी नवजात बाळांच्या हृदयरोग व शस्त्रक्रिया तज्ज्ञांची खूप आवश्यकता आहे. ही कन्सेप्ट सध्या रुजलेली नाही. त्यातच नागपूर शहरात नवजात बाळांच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारे अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध नाहीत. नवजात बाळांवर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची तर शहरात कुठेही सोय नाही. या शस्त्रक्रियेसाठी हैद्राबाद किंवा मुंबई गाठावी लागते. आजची परिस्थिती लक्षात घेता शहरात शासकीय अद्यावत बाळरोग हॉस्पिटलची गरज आहे. या सोयी उपलब्ध झाल्यास नवजात बाळांचे मृत्युमुखी पडण्याचे जे प्रमाण आहे, त्यात घट होईल.
डॉ. अभय भोयर (बाळ हृदयरोग तज्ज्ञ व शस्त्रक्रिया तज्ज्ञ)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ten percent of heart disease in newborn infants

ताज्या बातम्या