अत्यंत रेखीव सजावटीमुळे आणि चकाचक बांधकामामुळे मुंबईतील एक आकर्षण ठरलेले टर्मिनल-२ सध्या एका वेगळ्याच कारणासाठी गाजत आहे. यंदाच्या वर्षांत जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीतच या टर्मिनलवर सोने तस्करीच्या ५०० घटना उघडकीस आल्या असून या घटनांमधून ५७८ किलो सोने जप्त करण्यात आले. यापैकी ३२३ किलो सोने एप्रिल ते जून यादरम्यान जप्त करण्यात आले होते. पहिल्या सहा महिन्यांतील हा ‘परफॉर्मन्स’ पाहता येत्या वर्षांत सोने तस्करीच्या हजारांहून अधिक घटना पकडण्यात येतील, अशी अटकळ असून हा गेल्या दोन दशकांतील विक्रमच ठरणार आहे.
जानेवारी ते जुलै यादरम्यान सोने तस्करीच्या ५७० घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांपैकी बहुतांश सोने हे आखाती देशांमधून देशात आणण्याचा प्रयत्न झाला आहे. पहिल्या सहा महिन्यांत ५३५ किलो सोने जप्त करण्यात आले. त्यापैकी ३२३ किलो सोने तर शेवटच्या तीन महिन्यांतच जप्त झाले. २०१३मध्ये याच तीन महिन्यांच्या म्हणजे एप्रिल ते जून या कालावधीत फक्त ५५ किलो सोने जप्त झाले होते. म्हणजेच सोन्याच्या तस्करीत तब्बल सात पटींनी वाढ झाली आहे.
सोने तस्करीच्या घटनांमध्ये १९८८-८९ या काळात विक्रम प्रस्थापित केला गेला होता. या वर्षांत ८०० किलोग्रॅम सोने जप्त झाले होते. मात्र ८०च्या दशकात मुंबईत सुरू असलेल्या तस्करीच्या कालखंडाचा वेध घेता हे सोने खूपच कमी मानले जात होते. आता यंदा हा ८०० किलोंचा विक्रमही तस्कर मागे टाकण्याच्या वाटेवर आहेत.
जप्त केलेल्या सोन्याचे काय होते?
टर्मिनल-टूवरील सिजर कक्षात हे सोने जमा केले जाते. हे सोने लॉकरमध्ये ठेवले जाते. या सोन्याच्या अधिकाराबाबत काही निर्णय होईपर्यंत हे सोने तेथेच पडून असते. सोन्याची तस्करी करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली जाते. त्यानंतर आलेल्या आदेशांनुसार हे सोने रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाकडे पाठवले जाते. तेथे हे सोने वितळवून त्याची नाणी तयार होतात. त्यानंतर ही नाणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बुलियन शाखेकडे पाठवली जातात. येथे या नाण्यांचा लिलाव होतो. त्या लिलावातून मिळणाऱ्या रकमेपैकी काही टक्के रक्कम सीमाशुल्क विभागाला दिली जाते.
कुठे लपवतात सोने?
सोने लपवण्यासाठी किंवा तस्करी करण्यासाठी पूर्वापार काही ‘जागा’ तस्करांनी हेरल्या आहेत. यात ध्वनिक्षेपक, बूट, चॉकलेट बार, गुदद्वार, विमानाच्या शौचालयात, अंतर्वस्त्रांत, साबणांत, शर्टाच्या बटणांत, कमरेला बांधून, घडय़ाळात, सोने वितळवून ते खजुरांत लपवून, पट्टय़ाच्या बक्कलमध्ये, टॉर्चच्या बॅटरीत, मोबाइल फोनमध्ये सोन्याची बॅटरी म्हणून, ब्रीफकेस.
मोठय़ा घटना
०     २४ मार्च रोजी मॉरिशसचा पासपोर्ट असलेले एका कुटुंबातील सात जण बँकॉकवरून मुंबईत उतरले. या कुटुंबातील स्त्रियांकडे ४.९ किलोग्रॅमच्या ३७ बांगडय़ा होत्या.
०     एप्रिल महिन्यात बँकॉकवरून आलेल्या एका आई-मुलीच्या जोडगोळीकडून १.४२ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते. हे सोने त्यांनी आपल्या अंतर्वस्त्रात लपवले होते.