सह्य़ाद्रीच्या डोंगररांगा, समुद्रकिनारे आणि धोकादायक इमारतींमुळे नैसर्गिक आपत्तींबाबत कायम संवेदनशील असणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ाचा आपत्ती निवारण आराखडा जिल्हाधिकारी पी. वेळारासू यांनी जाहीर केला आहे. या आराखडय़ानुसार जिल्ह्य़ातील १३.३३ टक्के भूभाग पूर परिस्थितीस संवेदनशील आहे. अतिवृष्टी, धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग आणि समुद्राची भरती या तिन्ही बाबी एकत्र आल्यास जिल्ह्य़ातील एकूण १०१ गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून त्यांना याबाबत सतर्क करण्यात आले आहे.
जिल्ह्य़ातील माळशेज घाट हा मुख्यत्वे दरड प्रवण क्षेत्र असून तेथील भूस्खलन रोखण्यासाठी शासनाने एक कोटीचे अनुदान जाहीर केले आहे. बचाव कार्यासाठी ४५ बोटी आणि ६०० लाइफ जॅकेट असून जिल्ह्य़ातील विविध महानगरपालिका व नगरपालिकांच्या आपत्ती निवारण कक्षात हे साहित्य उपलब्ध आहे. मुरबाड तालुक्यातील मुतुळई आणि न्याहडी तर शहापूर तालुक्यातील डोळखांब व टाकीचे पठार येथे वीज अटकाव यंत्रणा आहे.
जिल्ह्य़ात चार मोठी आणि १२ लहान अशी एकूण १६ धरणे आहेत. पावसाळ्यात पाटबंधारे विभागामार्फत दैनंदिन पर्जन्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षास कळविली जाते. धरणातून पाण्याचा विसर्ग करायचा असेल तर जिल्हा नियंत्रण कक्षास त्याची पूर्वकल्पना दिली जाते. आपद्ग्रस्तांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यासाठी तात्पुरते निवारे शोधून त्यात पुरेसा अन्नसाठा आणि पाण्याची व्यवस्था करून ठेवण्याचे आदेश सर्व तहसीलदारांना देण्यात आले आहेत.