नवी दुकानदारी : सुट्टीलाच बुट्टी

वेगाने सुरू असलेल्या नागरीकरणामुळे ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली यांसारख्या शहरांचा चेहरामोहरा गेल्या दशकभरात पूर्णपणे बदलला आहे.

वेगाने सुरू असलेल्या नागरीकरणामुळे ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली यांसारख्या शहरांचा चेहरामोहरा गेल्या दशकभरात पूर्णपणे बदलला आहे. शहरीकरणाची झूल चढली असली तरी जुने ठाणे अजूनही आपले गावपण टिकविण्याचा शर्थीचा प्रयत्न करत आहे, तर नवी मुंबईसारखे शहर मुंबईसारखा हुबेहूब चेहरा परिधान करण्यासाठी धडपडत आहे. जागतिकीकरणाच्या वेगात संपूर्ण ठाणे जिल्ह्य़ातील सगळीच शहरे ‘ग्लोबल’ बनू पाहत आहे. लोकल ते ग्लोबल अशा या प्रवासात मुंबईला खेटून उभी असलेली ही सगळी शहरे स्वत:च्या सवयी बदलू पाहत आहेत. गेल्या काही वर्षांपासून या शहरांमधील जुन्या बाजारांनीही कात टाकली असून बडे मॉल, शॉपिंग सेंटर्स यामुळे उभ्या राहत असलेल्या स्पर्धेपुढे टिकाव धरायचा असेल तर आपणही या बदलांचा भाग व्हायला हवे, ही जाणीव या शहरांमध्ये पक्की होऊ लागली आहे. शहरांमधील या संक्रमणाविषयी..
ठाण्याच्या बाजारपेठेत सोमवार म्हणजे सुट्टीचा वार. नवी मुंबईतही काल-परवापर्यंत शुक्रवारी शुकशुकाट दिसायचा. शासकीय आदेशानुसार आठवडय़ाची सुट्टी घेणे बंधनकारक असायचे. त्यामुळे ‘वीकली ऑफ’ या बाजारपेठांच्या अंगवळणीच पडलेला. गेल्या काही वर्षांपासून मात्र आठवडय़ाच्या सुट्टीचा हा ‘ट्रेंड’ बदलू लागला असून वाढत्या स्पर्धेमुळे सुट्टीचा बाजार आता कालबाह्य़ ठरू लागला आहे. बहुभाषकांच्या नवी मुंबईने शुक्रवारची सुट्टी केव्हाच मोडीत काढली असून ठाण्याच्या बाजारानेही ही ‘सवय’ सोडून दिली आहे. डोंबिवलीतील व्यापाऱ्यांनी मात्र सोमवार बंदचा सिलसिला कायम ठेवला असला तरी तेथेही व्यवहार सुरू ठेवण्याचे वारे वाहू लागले आहेत.
वाढलेली स्पर्धा, आंतराष्ट्रीय ब्रॅन्ड्सचा स्थानिक बाजारांमध्ये झालेला शिरकाव यामुळे सुट्टी घेणे म्हणजे व्यापारावर गदा आणणे, असे व्यापाऱ्यांना वाटू लागले आहे. आठवडाभर काम केल्यानंतर एखादी सुट्टी मिळावी, हे तर ठरलेलेच असते. काही आस्थापनांमध्ये पाच दिवसांचा आठवडा सुरू झाला आहे. मात्र, दररोजच्या व्यापारावर पोट असणाऱ्या दुकानदारांना एका दिवसाची सुट्टीही आता नकोशी होऊ लागली आहे. सरकारी, खासगी आस्थापनांप्रमाणे व्यापारी दुकानांनाही एक दिवसाची सुट्टी हक्काची मानली जायची. स्वतंत्र भारताच्या निर्मितीनंतर १९४८ मध्ये ‘बॉम्बे शॉप एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट’ची निर्मिती करण्यात आली होती. या कायद्याने दुकान व्यवसायाच्या विविध कायद्यांची मांडणी करण्यात आली. दुकानातील सर्व कारभाराचे कायदेशीर पालन होत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी शॉप एस्टॅब्लिशमेंट विभागाची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार आठवडय़ातून एक सुट्टी निश्चित करण्यात आली. रविवार हा सर्वासाठी सुट्टीसाठी खुला दिवस ठेवण्यात आला होता. मात्र रविवारी ग्राहकांना असलेल्या सुट्टीमुळे खरेदीमध्ये होत असलेली उचल लक्षात घेऊन प्रत्येक शहराने आपल्या आठवडय़ातील एक सुट्टी इतर वारांना घेण्याचे ठरवले. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीतही यानुसार आठवडा सुट्टी सुरू झाली. ठाण्यातील शिवाजी पथ, गोखले रोड, राममारुती रोड यांसारख्या पश्चिमेतील भागांमध्ये सोमवारी कडकडीत बंद असायचा, तर नवी मुंबईत वाशी, कोपरखैरणे या जुन्या उपनगरांना शुक्रवारी सुट्टी असायची. ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत बुधवारी आणि होलसेल व्यापारी रविवारी सुट्टी घेत होते. सुट्टीचा हा काळ अत्यंत कडक पद्धतीने पाळला जात होता.
खासगीकरणाच्या लाटेत हे चित्र झपाटय़ाने बदलू लागले आहे. सर्वच शहरांमध्ये मॉल संस्कृती रुजू लागल्याने वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ‘वीकली ऑफ’ नको रे बाबा, असा सूर आता ठाणे, नवी मुंबईतील जुन्या बाजारपेठांमध्ये उमटू लागला आहे. स्थानिक कायद्यांचे कोणतेच नियंत्रण बडय़ा कंपन्यांवर येत नसल्याने साप्ताहिक सुट्टीच्या बंधनातून हे उद्योग आपोआप सुटू लागले आहेत. त्यामुळे शहरातील अन्य दुकाने सुट्टी घेत असताना मोठय़ा बॅ्रन्डची शोरूम्स बिनधोकपणे व्यवसाय करताना दिसायची. ठाण्यातील राममारुती मार्गावर पेपे, किलर, ली-कूपर, स्पायकर अशा वेगवेगळ्या बॅन्डची दुकाने आहेत. मॉल सुरू असताना ही दुकाने सोमवारी बंद असायची. त्यामुळे व्यापारावर परिणाम होत असल्याचे चित्र होते. त्यामुळे राममारुती रोडवरील व्यापाऱ्यांनी सुट्टी घेणे बंद केले आहे.
आठवडय़ाच्या सुट्टीचा ट्रेन्ड अजूनही ठाणे, नवी मुंबईतील सोन्याच्या
 पेढय़ाचालकांनी कायम ठेवला आहे. सोमवारी या सगळ्या पेढय़ा बंद असतात. ठाण्यातील गोखले मार्गावर काही मराठी हॉटेल्स बंद असतात. ठाणे शहरात काही बँकांनाही सोमवारी सुट्टी असते. ठाण्यातील जांभळी नाका परिसरातील घाऊक बाजारपेठा रविवारी बंद असतात. या बाजारातील काही व्यापाऱ्यांनी सुट्टी रद्द करण्याचा प्रयत्न करून पाहिला. मात्र, महापालिकेने या व्यापाऱ्यांना नोटिसा बजाविल्या. त्यामुळे या बाजारपेठा पुन्हा बंद राहू लागल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Thane market now open on monday due to competition

ताज्या बातम्या