ठाणे महापालिकेच्या चार प्रभागांमधील पाच जागांकरिता झालेल्या पोटनिवडणुकीत तीन जागांवर शिवसेनेचे, तर दोन जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले.
सार्वत्रिक निवडणुकीनंतर काँग्रेसच्या ताब्यात गेलेल्या वागळे इस्टेट परिसरातील तिन्ही जागा पोटनिवडणुकीनंतर शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत.  काँग्रेसला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश करणारे रवींद्र फाटक आणि त्यांच्या पत्नी जयश्री या रहेजा, रघुनाथनगर परिसरातून मोठय़ा मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. सावरकरनगर परिसरातून शिवसेनेच्या कांचन चिंदरकर यांनी विजय मिळविल्याने गेल्या निवडणुकीत निसटलेला हा गड शिवसेनेने पुन्हा ताब्यात घेतला आहे.  
काँग्रेस पक्षातून शिवसेनेत आलेले रवींद्र फाटक, जयश्री फाटक, कांचन चिंदरकर यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. तर मुंब््रयातील राष्ट्रवादीचे रौफ लाला आणि रजीया शेख या दोघांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले. त्यामुळे या पाच जागांकरिता रविवारी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. सावरकर-लोकमान्यनगर येथील प्रभाग क्रमांक १३ मध्ये शिवसेनेच्या उमेदवार कांचन चिंदरकर यांनी ३८८८ मतांनी काँग्रेसच्या उमेदवार शीतल चव्हाण यांचा पराभव केला.
किसननगर, पडवळनगर प्रभाग क्रमांक ३४ (अ) शिवसेनेचे रवींद्र फाटक झाले असून त्यांनी काँग्रेसचे डॉ.अभिजीत पांचाळ यांचा ३२७९ मतांनी पराभव केला. तर याच प्रभागात (ब) मधून जयश्री फाटक विजयी झाल्या आहेत. त्यांनी  काँग्रेसच्या ललिता टाकळकर यांचा ३५६९ मतांनी पराभव केला आहे. सार्वत्रिक निवडणुकीत या तिन्ही प्रभागांत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. मात्र, या निवडणूकीत हे तिन्ही प्रभाग शिवसेनेने काबीज करत काँग्रेसला धक्का दिला आहे. पोटनिवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा केली जाईल, असे कॉँग्रेसच्या नेत्यांनी या वेळी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीला सपाचे आव्हान
मुंब्य्रातील प्रभाग क्रमांक ६१ (अ) मध्ये राष्ट्रवादीचे साजीद मोहम्मद युसूफ आणि सपाचे अन्सारी नफीज मोहम्मद अनिस यांच्यात लढत होती. साजीद युसूफ यांनी ११३९ मतांनी अन्सारी यांचा पराभव केला. तर प्रभाग क्रमांक ६३ (अ) मध्ये राष्ट्रवादीच्या शेख हसीना अब्दुल यांनी सपाच्या शहा परा असफाक यांचा २६४२ मतांनी पराभव केला. या दोन्ही प्रभागांत राष्ट्रवादीच्या उमेदवारांपुढे समाजवादी पार्टीच्या उमेदवारांचे आव्हान होते, मात्र राष्ट्रवादीने आपले गड कायम राखले.