म्हारळ गावातील तरुणाची कल्पकता; यंदाच्या पावसात अनोख्या सवारीचा अनुभव

पावसात मोटार बाइकवरून सवारी करण्याची मजा काही औरच. पावसाच्या सरी अंगावर घेत भिजत, आनंद लुटत ही सवारी अनेकांसाठी आनंददायी ठरते. मात्र, हाच पाऊस बाइकवरून कामावर जाताना मात्र अडचणीचा वाटू लागतो. मुसळधार पावसात मोटारसायकलवरून प्रवास म्हणजे जिकिरीचा आणि तितकाच त्रासाचाही. मात्र, मुसळधार पावसात ‘बाइक छत्रीचा’ तुफानी पर्याय आता ठाणे, कल्याण डोंबिवलीतील तरुणांसाठी पसंतीचा ठरू लागला असून एरवी सोशल मीडियावरून दिसणारा हा ट्रेण्ड यंदा प्रत्यक्ष रस्त्यावर दिसू लागला आहे.

पावसाळा सुरू होण्याअगोदर सोशल मीडियावर बाइक छत्र्यांचे फोटो फिरले होते. परंतु ही संकल्पना तरुणाईच्या कितपत पसंतीत उतरेल याचा अद्याप कोणाला अंदाज आलेला नाही. कल्याणमधील म्हारळ गावात राहणाऱ्या सचिन अहिरे या तरुणाने त्याच्या मोटारसायकलला ही अनोखी छत्री लावून घेतली आहे. अहिरे यांची ही अजब-गजब बाइक छत्री सध्या येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. परिवहन विभागाचे कर्मचारीही सचिन यांना अडवून या छत्रीची पाहणी करताना दिसतात. याविषयी सचिनकडे विचारणा केली असता त्याने सोशल मीडियावरूनच ही कल्पना आपण उचलली असल्याचे सांगितले. उन्हाळ्यात या छत्रीचे फोटो पाहिले होते. परंतु तेव्हा ही कल्पना फारशी पटली नाही. पुढे आपल्याच एका मित्राने बाइकला अशी छत्री बसवून घेतल्याचे लक्षात आले. तेव्हा कल्याण बेतुरकरपाडा येथे राहणारे प्रवीण महाजन यांच्याकडून ती छत्री खरेदी केल्याचे सचिन यांनी सांगितले. बंगलोर येथून ते ही छत्री आणतात. मुंबईमध्ये ३० बाइकस्वारांनी तर ठाण्यात १४ जणांकडे, कल्याणमध्ये अद्याप चार जणांकडे ही बाइक छत्री असल्याचे त्याने सांगितले.

बाइक छत्रीचे फायदेही खूप आहेत. गाडीनुसार छत्रीचा आकार असल्याने पावसात फारसे भिजणे होत नाही. शिवाय तुमच्या पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीचाही पावसापासून बचाव होतो. ही छत्री वापरताना अर्थात बाइकचा वेग कमी ठेवावा लागतो. केवळ बाइकस्वारांसाठी ही छत्री उपलब्ध आहे असेही नाही.

प्रत्येक दुचाकीनुसार ही छत्री त्या त्या आकारात उपलब्ध आहे. ही छत्री घेण्यापासून ते मोटारसायकलला बसवून घेण्यापर्यंतचा खर्च हा पंधराशे ते दोन हजार एवढा असून पावसाळा संपल्यानंतर ती काढूनही ठेवता येईल. तसेच इतर ठिकाणी बॅगेतूनही घेऊन जाणे शक्य असल्याचा दावा सचिनने केला.