रोगांवर मात करणारे बालक सुदृढ -डॉ. लवंगे

संपूर्ण शारीरिक विकास व रोगांवर मात करणारे बालक हे सुदृढ बालक म्हणून ओळखले जाते.

संपूर्ण शारीरिक विकास व रोगांवर मात करणारे बालक हे सुदृढ बालक म्हणून ओळखले जाते. बाळाच्या संपूर्ण शारीरिक विकासासाठी पालकांनी शून्य वयोगटापासून विविध लसीकरण करून घेऊन त्यांना सकस आहार द्यावा, जेणेकरून त्यांची रोगावर मात करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढेल, असे प्रतिपादन राज्य विमा कामगार रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक लवंगे यांनी केले.
कामगार व महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य विमा कामगार रुग्णालयात कामगारांच्या शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांसाठी ‘सुदृढ बालक स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. डॉ. मीना देशमुख म्हणाल्या, मुलांना लहान वयातच आरोग्यााविषयी नेहमीच महत्त्व पटवून द्यावे. आमचे मूल वजनाने अधिक आहे म्हणून सुदृढ समजू नये. बालकांची दर दोन तीन महिन्यानंतर संपूर्ण आरोग्याची तपासणी करून घ्यावी. तसेच वयोगटानुसार ठरविल्याप्रमाणे सर्व प्रकारचे लसीकरण करून घेण्याचा सल्ला डॉ. अलका जोगेवार यांनी दिला. याप्रसंगी रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जे.डी. हुलके, डॉ. हेमनानी, डॉ. भावना चौधरी, डॉ. संदीप यादव यांनीही आपले विचार मांडले.
यावेळी झालेल्या सुदृध बालक स्पर्धेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रथम क्रमांक कश्यप शंभरकर याला प्राप्त झाला, तर दुसरा क्रमांक प्रियांशू चौधरी याने पटकावला. एक ते तीन वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक वेदाश्री वानखेडे तर दुसरा क्रमांक आदित्य भाकरे यांना मिळाला. तीन ते पाच वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक आयुषी शिनवे याने तर द्वितीय क्रमांक श्रीकांत वानखेडे याने पटकावला. कल्पना समुद्रे, ओजल राऊत या बालकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या मुलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी प्रविणा इंदूरकर, सिद्धार्थ दामले, नंदा हटवार, चंद्रा आदी कर्मचाऱ्यांसह कामगारांचे कुटुंबीय मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The child who overcome the disease is healthy