नक्षलवाद्यांनी ग्राम पंचायत सदस्य नंदलाल मेहरसिंग टेकाम (२३) याचे अपहरण केल्यानंतर आज पहाटे गोळय़ा घालून हत्या केली. सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्य़ातील अतिदुर्गम भागात दहशतीचे वातावरण आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा हिंसक कारवायांना सुरुवात केली आहे. काल मंगळवारी पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी अर्जून पेंटा मडावी (३५) या युवकाची गोळय़ा झाडून हत्या केली होती. या घटनेमुळे कल्हेड व झिंगानूर परिसरातील गावातील आदिवासींमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या घटनेला चोवीस तासाचा अवधी झाला नाही तोच नक्षलवाद्यांनी आज रांगी येथील रहिवासी व धानोरा पंचायत समितीचे सदस्य नंदलाल मेहरसिंग टेकाम या युवकाची गोळय़ा घालून हत्या केली. या घटनेमुळे धानोरा व रांगी परिसरात दहशत आहे.
शेकडोच्या संख्येत असलेले नक्षलवादी मंगळवारी रात्री रांगी गावात आले. यावेळी टेकाम याच्या घरात शिरून त्यांनी त्याचे अपहरण केले. रात्रभर टेकाम नक्षलवाद्यांसोबत जंगलात फिरत होता. सकाळ होताच नक्षलवाद्यांनी त्याची हत्या केली. हत्येनंतर टेकाम याचा मृतदेह गावाशेजारच्या रस्त्याच्या कडेला आणून ठेवला. प्रातर्विधीसाठी जाणाऱ्या गावकऱ्यांना मृतदेह दिसताच त्यांनी या घटनेची माहिती धानोरा पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर धानोरा पोलिस दुपारनंतर घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केल्यानंतर कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. दोन दिवसात दोन आदिवासींची गोळय़ा घालून हत्या केल्याने नक्षलवाद्यांनी हत्यासत्र आरंभ केले आहे. पोलिस दलाने या हत्याकांडाची गंभीर दखल घेतली असून नक्षलवादग्रस्त भागात गस्त वाढविण्यात आली आहे.