जंतरमंतरवर १२ डिसेंबरला १ लाख शेतक-यांचे आंदोलन- रघुनाथदादा पाटील

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्यात आंदोलनादरम्यान मिलिभगत असल्याचे जयंत पाटील यांच्या मिळालेल्या क्लिपवरून उघड झाले आहे. विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी जयंत पाटील यांना मदत करण्याची तडजोड झाली असल्याचा आरोप रघुनाथदादा पाटील केला.

उसासह शेतमाला उत्पादनखर्चावर आधारित न्याय नफ्यासह रास्त भाव मिळावा. साखर, कापूस, सोयाबीन तसेच अन्य शेतमालावर जास्तीत जास्त आयात कर लावावेत, हे शेतमाल निर्यातीसाठी शक्य तेवढय़ा सवलती देऊन शेतमाल निर्यातीला चालना द्यावी आदी मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने येत्या १२ डिसेंबरला दिल्लीच्या जंतरमंतरवर १ लाख शेतकरी बेमुदत आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत दिली. दिल्लीतील आंदोलनासाठी महाराष्ट्रातून ५ हजार तर देशभरातून लाखावर शेतकरी सहभागी होतील असा दावा त्यांनी केला. संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष शंकरराव गोडसे यांच्यासह प्रमुख कार्यकत्रे या वेळी उपस्थित होते.
रघुनाथदादा पाटील म्हणाले, की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्यात आंदोलनादरम्यान मिलिभगत असल्याचे जयंत पाटील यांच्या मिळालेल्या क्लिपवरून उघड झाले आहे. लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना तर विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी जयंत पाटील यांना मदत करण्याची तडजोड झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. राजू शेट्टी फसवे असून हिंसक आंदोलन करून त्यांनी शेतक-यांसह समाजाची व शासनाचीही दिशाभूल केली आहे.
एफआरपीपेक्षा ही कमी ऊसदराची भूमिका घेऊन लबाडी केली असल्याची टीका रघुनाथदादांनी केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऊसदरप्रश्नी राज्याच्या शिष्टमंडळाला पंतप्रधानांशी चच्रेची संधी दिली. यावर पंतप्रधानांनी कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली संबंधित केंद्रीय मंत्र्यांची समिती गठित केली आणि उसाला योग्य दर  मिळण्याचे पहिले सकारात्मक पाऊल पडले होते. नजीकच्या काळात राज्याच्या व केंद्राच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने उसाला रास्त दर मिळण्याच्या आशा होत्या, मात्र शेट्टींनी पंतप्रधानांच्या भूमिकेलाही झुगारून आंदोलन केले.
एसटी बस, रस्ते आणि पोलीस चौक्यांत उसाचे पसे ठेवल्यासारखे एसटी बसेस, हमरस्ते व पोलीस चौक्यांवर हल्ले करून सर्वसामान्यांना व पोलिसांना वेठीला धरून मोठे नुकसान केले. आंदोलनांच्या माध्यमातून राजकारणाचा फड उभारला. अशी जोरदार टीका करताना, यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठय़ावर असून लवकरच फुटीचे चित्र समोर येईल असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला. सरकार उसाची किंमत ३,५६० रुपये पकडून कर घेते, मग तितकाच ऊसदर जाहीर करायला शासनाला लाज वाटते का? तसेच यापेक्षा कमी ऊसदर घेणे गोलमाल नव्हे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
ब्रिटिशांच्या आयात धोरणाला कडाडून विरोध करणारे बाबू गेनू यांचा १२ डिसेंबरला स्मृतिदिन आहे आणि यांचे औचित्य साधून आपल्या संघटनेच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या जंतरमंतरवर उसासह शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित रास्त दर मिळावा. आयात होणाऱ्या शेतमालावर अधिकाधिक कर लावताना शेतमाला निर्यातीला जास्तीतजास्त सवलती मिळाव्यात, निर्यात कर लावू नयेत, शेतमाल निर्यातीला चालना मिळावी यासाठी १ लाखावर शेतकरी आंदोलन करून केंद्र व राज्य शासनाला जाग आणतील, संसदेचे अखेरचे अधिवेशन असल्याने उसासह शेतमालाच्या न्याय्य हमीदरावर चर्चा करण्यास आम्ही शासनाला भाग पाडू असा विश्वास रघुनाथदादांनी व्यक्त केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The movement of 1 lakh farmers on 12 december at jantaramantar

ताज्या बातम्या