अंधाराला छेद देणारी माणसे प्रकाश निर्माण करण्याची उमेद बाळगतात. उच्च ध्येय गाठण्यासाठी ती टीका व टवाळींची काळजी करत नाहीत. कारण, त्यांची कष्टावर निष्ठा असते. कष्ट करताना अपमान, तिरस्कार पचवतात, अशा माणसांच्या ठिकाणी हव्यास निर्माण होत नाही. परिस्थिती बिकट असली तरी त्यांच्या मन:स्थितीत चिकाटी, जिद्द असते. अशी कष्टावर प्रेम करणारी माणसेच मोठी होतात, असे प्रतिपादन धुळ येथील सनदी लेखापाल प्रकाश पाठक यांनी मंगळवारी कारंजा (लाड) येथील मुलजी जेठा हायस्कूलच्या नानासाहेब दहीहांडेकर प्रांगणात केले.
शरद व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. ‘ज्यांच्या हाती शून्य’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
मोठय़ा माणसांचे गुणविशेष सांगताना प्रकाश पाठक  म्हणाले, काही माणसे जन्मत: श्रीमंत असतात, तर काही दारिद्रय़ात जन्मलेली असतात. ही माणसे संघर्ष करून मोठी होतात. परिस्थितीची जाणीव ठेऊन ते झटत असतात. त्यांच्या आचरणात व विचारात नीतीमूल्यांचे अधिष्ठान असते म्हणून देशाचे पंतप्रधान झालेले लालबहादूर शास्त्री अगदी सामान्य खोल्यांमध्ये राहत होते. आपले मानधन कमी करा, असे स्वत:हून सांगणाऱ्या शास्त्रीजींनी काटकसरीने जगण्याचा मोलाचा संदेश दिला. माजी राष्ट्रपती झाल्यानंतर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या भेटीला येणाऱ्या नातेवाईकांचा जेवणाचा खर्च शासनाच्या तिजोरीतून न करता माझ्या पगारातून करावा, असे सांगितले. ही पारदर्शकता मात्र आज दिसत नाही, अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली.
आपल्या व्याख्यानातून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत जन्माला आलेल्या व्यक्तींनी आपल्या परिस स्पर्शाने आपल्या जीवनाचे कसे सोने केले, याची अनेक उदाहरणे दिली. प्रसिद्ध गायक सुधीर फडके सुरुवातीला चहा विकत, ग. दि. माडगूळकरांनी उदबत्त्या विकल्या.
लता मंगेशकर यांनी कोल्हापूर येथे स्टुडियोत नोकरी केली. निळू फुले पुण्याच्या महाविद्यालयात माळ्याचे काम करत होते. शेक्सपिअरने खाटीकखान्यात कामे केले. मेहमूद चालक, तर जॉनी वॉकर वाहक होते. गुलजार मोटार गॅरेजमध्ये काम करत होते. धीरूभाई अंबानींनी पेट्रोलपंपावर लिपिकाची नोकरी केली. ही सर्व माणसे कष्टाने मोठी झालेली आहेत. ती ध्येयासाठी झटली म्हणून मोठी झाली म्हणून आजच्या युवकांनी श्रमप्रतिष्ठा जोपासून आपले ध्येय गाठावे, असे आवाहन प्रकाश पाठक यांनी केले.
प्रारंभी डॉ. दामोदर कर्वे यांनी व्याख्यात्यांचे स्वागत केले, तर परमेश्वर व्ववहारे यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद दहीहाडके यांनी, तर निशीकांत परळीकर यांनी शारदास्तवन म्हटले. आभार जयदीप कुळकर्णी यांनी मानले.