बोरिवली येथील एक्सर तळेपाखाडी पालिका शाळेच्या इमारतीत महाविद्यालय चालविणाऱ्या श्री हरी एज्युकेशन ट्रस्टने गैरकारभार केला असेल तर पालिकेने संस्थेविरुद्ध कारवाई करावी. मात्र त्याच वेळी विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही व विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आमदार गोपाळ यांनी स्पष्ट केले आहे. या शाळेच्या वर्गखोल्या वापरात नसल्यामुळेच तेथे महाविद्यालय सुरू व्हावे व स्थानिकांची सोय व्हावी यासाठीच आपण तशी शिफारसही केली होती. संस्था आणि पालिका यांच्यातील अटी वा कराराशी आपला काही संबंध नाही, असेही आमदार शेट्टी म्हणाले.
इयत्ता सातवीनंतर शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. असे असतानाही शिवसेना-भाजप युती पालिकेच्या माध्यमातून आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करीत आहेत, असे सांगून गोपाळ शेट्टी म्हणाले की, एक्सर तळेपाखाडी आणि आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयाती सुविधा नव्हती. त्यामुळे श्री हरी एज्युकेशन ट्रस्टला सेंट रॉक महाविद्यालय सुरू करण्यासाठी एक्सर तळेपाखाडी शाळेतील वर्ग खोल्या मिळवून देण्यास मदत केली. मात्र या संस्थेने महाविद्यालय चालविताना पालिका शाळेत काही गैरकारभार केला असेल तर प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. गरज भासल्यास या संस्थेला दिलेल्या वर्ग खोल्याही काढून घ्याव्यात. अजूनही या इमारतीतील काही खोल्या रिकाम्याच असून पालिका प्रशासनाने त्याचा योग्य वापर करावा, असेही ते म्हणाले.
या संस्थेविरुद्ध काँग्रेस आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे. या संस्थेने खरच गैरकारभार केला असेल तर या आंदोलनात मी स्वत: सहभागी होईन. मात्र या संस्थेवर कारवाई करताना कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी पालिकेने घ्यावी, असेही ते म्हणाले.