* ३१५ पैकी २३० यात्रेकरू नातेवाईकांच्या संपर्कात
* आतापर्यंत ८७ जण सुखरूप परतले
बद्रीनाथला गेलेल्या नागपूर विभागातील ३१५ यात्रेकरूंपैकी २३० यात्रेकरू नातेवाईकांच्या संपर्कात असून ८५ यात्रेकरू अद्याप संपर्कात नसल्याने त्याबद्दल चिंतेचे काहूर उठले आहे.    नागपूर विभागातील गडचिरोली वगळता उर्वरित पाच जिल्ह्य़ातील ३१५ पर्यटक बद्रीनाथला गेले होते. यापैकी संपर्क झालेल्या २३० पैकी ८७ परतले असून ८५ पर्यटकांशी संपर्क झालेला नाही.
राज्य शासनाने डेहराडून, बद्रीनाथ व ऋषिकेश येथे तीन मदत केंद्रे उभारली. त्यात विदर्भातील देवरीचे सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, वध्र्याचे नायब तहसीलदार धनंजय देशमुख, तसेच नागपूर महापालिका आयुक्त कार्यालयातील केशव कोठे, राजेंद्र डकरे व दिलीप चव्हाण या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ऋषिकेशला असलेले केशव कोठे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून आज संपर्क होऊ शकला. लोकसत्ताशी बोलतांना ते म्हणाले की, पाऊस व अन्य नैसर्गिक संकटांचा सामना करीत बचाव कार्य करावे लागत असल्याने वेग कमी आहे. विदर्भातील काही यात्रेकरू केदारनाथला अडकून पडले असले तरी ते सुखरूप आहेत. पण, त्यांच्यापर्यंत पोहोचणे सध्या अशक्य आहे. आमच्या केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन आम्ही वारंवार करीत आहोत. रेल्वेच्या उपलब्धतेनुसार सुखरूप प्रवाशांची पोलिसांकडे नोंद करून त्यांना रवाना केले जाते. सोय न होऊ शकणाऱ्या पर्यटकांना येथील अतिथीगृहात ठेवण्यात आले असून त्यांच्या भोजनाची योग्य ती काळजी घेतली जात आहे. हा जलप्रकोप कल्पनातीत आहे. यात्रेकरूंना त्यांच्या इच्छेनुसार मोफ त रेल्वे व बससेवा उपलब्ध झाली आहे.  हिंगणघाटचे दलिया व नागपूरच्या जरीपटका भागातील बावणकर कुटूंबाशी संपर्क झाला असून ते आमच्यापयर्ंत पोहोचतील.
उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी, तसेच महाराष्ट्राचे पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस यांनी आमच्या मदत केंद्रास भेट दिली आहे, अशी माहिती कोठे यांनी आज दुपारी दिली. आज दिवसभरात नागपूर विभागातील एकाही यात्रेकरूशी संपर्क होऊ शकला नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
नागपूर विभागातील ८५ यात्रेकरूंशी अद्याप संपर्क न झाल्याने त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्य़ातील १६ पैकी १५, गोंदिया जिल्ह्य़ातील ८७ पैकी ८६, वर्धा जिल्ह्य़ातील ४९ पैकी ४१, भंडारा जिल्ह्य़ातील ७ पैकी ७, नागपूर जिल्ह्य़ातील १५६ पैकी ७९ पर्यटक संपर्कात आहेत. अद्याप संपर्कात नसलेल्या सर्वाधिक पर्यटकांची संख्या नागपूर जिल्ह्य़ातील आहे. संपर्कात असलेल्यांपैकी ८७ आपापल्या गावी परतले. उर्वरित हरसूल, जोशीमठ, हरिद्वार, डेहराडून, अयोध्या, वैष्णोदेवी, दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
२२ जूनपासून या मदतकार्यात असलेल्या नागपूर विभागाच्या चमूने विविध माध्यमातून उर्वरित पर्यटकांशी संपर्क करण्याचा व त्यांना परतीच्या मार्गावर पाठविण्याचा आटोकाट प्रयत्न चालविला आहे.