एक आठवडय़ापूर्वी डोंबिवलीतील ठाकुर्ली आणि आता ठाणे येथील इमारत दुर्घटनेनंतर नवी मुंबई पालिकेने आपल्या क्षेत्रातील सर्व इमारतींना संरचनात्मक परीक्षण सादर करण्याचे आदेश जारी केले आहेत. पालिकेच्या स्ट्रक्चरल ऑडिट पॅनलकडून हे ऑडिट करून घ्यावयाचे असून तसा स्टॅबेलिटी रिपोर्ट पालिकेकडून घेणे अभिप्रेत आहे. नवी मुंबईत पालिकेने ९२ इमारतींना धोकादायक जाहीर केले असून याव्यातिरिक्त आणखी शेकडो इमारती कमकुवत आणि निकृष्ट झालेल्या आहेत.
ठाण्यातील इमारत पालिकेने धोकादायक जाहीर केलेली नसताना ती कोसळल्याने पालिकेने सरसकट तीस वर्षे जुन्या इमारतींच्या सर्वेक्षणाचे पाऊल उचलेले आहे. सिडकोने बांधलेल्या बहुतांशी इमारती तीस वर्षे जुन्या असून काही इमारती १५ वर्षांत जर्जर झालेल्या आहेत.
ठाकुर्ली व ठाणे इमारत दुर्घटनेत वीसपेक्षा जास्त रहिवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहे. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. आश्विनी जोशी यांनी पालिका क्षेत्रातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींसाठी आकस्मिक पुनर्वसन आराखडा तयार करण्याचे तातडीचे आदेश दिले आहेत. त्यात अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांचे संक्रमण शिबिरात पुनर्वसन करण्याचे सुचविण्यात आले आहे. नवी मुंबईत अद्याप इमारत कोसळून मोठी दुर्घटना झाल्याची नोंद नाही. गावठाण भागात सुरू असलेल्या बेबंद बेकायदेशीर बांधकामांचे साहित्य कोसळून एक आठवडय़ापूर्वीच वडील व मुलीला जीव गमवावा लागला आहे. तुर्भे येथे सहा महिन्यांपूर्वी एक साडेबारा टक्के योजनेतील इमारत कोसळली होती पण त्यात जीवितहानी झाली नाही. नवी मुंबई पालिका क्षेत्रात १८ हजारपेक्षा जास्त छोटय़ा-मोठय़ा इमारती आहेत. त्यातील केवळ ९२ इमारती पालिकेने या वर्षी धोकादायक म्हणून जाहीर केल्या आहेत. यात धोकादायक असलेल्या वाशी जेएन-वन, जेएन-टू प्रकारातील २०९ पैकी केवळ सहा इमारतींचा समावेश आहे. त्यामुळे पालिकेच्या धोकादायक इमारती जाहीर करण्यातील फोलपणा समोर आला आहे.
वाशीतील या इमारती मनुष्यास राहण्यास लायक नसल्याचा अभिप्राय आयआयटीसारख्या संस्थेने १८ वर्षांपूर्वी दिला आहे. तरीही पालिकेने या इमारतींना धोकादायक इमारतींच्या यादीत टाकलेले नाही.
नवी मुंबईतील सिडकोनिर्मित इमारतींना अडीच एफएसआय देऊन पुनर्वसनाचा मार्ग खुला करण्यात आला आहे. पण ज्या इमारतींमुळे शहराला वाढीव एफएसआय मिळाला त्या वाशीतील अनेक इमारतींचा यात समावेश नाही. त्यामुळे नौपाडय़ासारखी दुर्घटना नवी मुंबईत कधीही होण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे. १५ हजार हेक्टर खारजमिनीवर मातीचा भराव टाकून उभारण्यात आलेल्या नवी मुंबईतील इमारतीतील बांधकाम साहित्य लवकर खराब होण्याची प्रक्रिया घडत आहे. खारे हवामान आणि जमिनीखाली असलेल्या खाऱ्या पाण्याच्या स्रोतामुळे ही प्रक्रिया वेगाने घडत आहे. इमारतीत उभारणीत वापरण्यात आलेले लोखंड गंजल्याने भिंतींना हात लावल्यानंतरही विजेचे धक्के बसत आहेत.
त्यामुळे नवी मुंबईतील इमारती अधिक धोकादायक होऊ लागल्या आहेत. त्यात पालिकेच्या दृष्टीने धोकादायक नसलेली नौपाडा येथील इमारत कोसळल्याने नवी मुंबई पालिकेने तीस वर्षे जुन्या सर्वच इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश सोसायटी व अर्पाटमेंटना जारी केले आहेत. तसे आवाहनदेखील प्रसिद्ध केले जाणार आहे.

प्रत्येक इमारतीचे स्टॅबिलिटी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक
तीस वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट तयार करणे कायदेशीर बंधनकारक आहे पण अनेक इमारतींचे असे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. त्यामुळे ठाण्यासारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येणार असून पालिकेच्या स्ट्रक्चरल ऑडिट पॅनलकडून ही तपासणी करणे अपेक्षित आहे. असे समाधानकारक ऑडिट झाल्यानंतर पालिकेकडून स्टॅबिलिटी रिपोर्ट दिला जाणार आहे. त्यासाठी नागरिकांनी विनाविलंब हे ऑडिट करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा