ठाणे जिल्ह्य़ातील औद्योगिक व नागरी वस्त्यांसाठी पाणीपुरवठय़ाचा महत्त्वाचा स्रोत असणारे मुरबाड तालुक्यातील बारवी धरण रविवार, २० जुलैपर्यंत २३ टक्के भरले आहे. गेल्या वर्षी जून महिन्यापासूनच पावसाची संततधार सुरू असल्याने या दिवशी धरणात तब्बल ८७ टक्के जलसाठा होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, धरणाची उंची सहा मीटरने वाढविण्यात आली असली तरी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन पॅकेजचा पेच न सुटल्याने विस्तारीकरण योजना रखडली होती. आता बऱ्याच अंशी हा प्रश्न सुटला असला तरी एका पाडय़ातील प्रकल्पग्रस्तांनी ताठर भूमिका घेतल्याने दरवाजे बसविण्याचे काम यंदाही होऊ शकलेले नाही. त्यामुळे बारवीतून वाढीव पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास आता पुढील वर्षांच्या पावसाचीच वाट पाहावी लागणार आहे. ठाणे जिल्ह्य़ातील शहरांची पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र ती भागविण्यासाठी कोणतेही नवे जलस्रोत निर्माण होत नाहीत. त्यामुळे पावसाळा संपला की लगेच पाणीकपात लागू होते. यंदाही जानेवारी महिन्यापासून १४ टक्के पाणीकपात असून बारवी विस्तारीकरण लांबणीवर पडल्याने ती पुढील वर्षीही कायम राहण्याची चिन्हे आहेत.  
बारवी धरणात सध्या कमाल १७६.६७ दक्षलक्ष घनलिटर पाणी साचते. विस्तारीकरणानंतर ३४० दशलक्ष घनलिटर पाणी साठणार आहे. ठाणे जिल्ह्य़ातील शहरांच्या भविष्यकालीन वाढत्या पाणीपुरवठय़ासाठी प्रस्तावित करण्यात आलेली काळू, शाई, पोशिर आदी धरणे अद्याप कागदावरच आहेत. त्यामुळे वाढीव पाणीपुरवठय़ासाठी बारवी विस्तारीकरण वरदान ठरणार आहे.