अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठोपाठ केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्रीपदी खासदार हंसराज अहीर आणि विधिमंडळ उपनेतेपदी ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड झाल्याने चंद्रपूर जिल्हा ‘लाईम लाईट’मध्ये आला आहे. प्रथमच या जिल्ह्यात एकाच वेळी तीन महत्त्वाची पदे मिळाल्याने प्रदूषणाच्या मुख्य समस्येसोबतच अन्य प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
काँग्रेसच्या राजवटीत या जिल्ह्याला अगदी सुरुवातीला मा.सा. कन्नमवार यांच्या रूपाने मुख्यमंत्री मिळाला होता. त्यानंतर बॅ.राजाभाऊ खोब्रागडे यांना राज्यसभेचे उपसभापतीपद तर शांताराम पोटदुखे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री झाले. वरोराचे अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे विधानसभेचे उपसभापती झाले होते. दादासाहेब देवतळे, रमेश गजबे, श्याम वानखेडे राज्यमंत्री, तर संजय देवतळे, विजय वडेट्टीवार, सुधीर मुनगंटीवार व शोभा फडणवीस मंत्री झाले होते, परंतु केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता येताच भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार राज्याचे अर्थ, नियोजन आणि वनमंत्री आणि खासदार हंसराज अहीर केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते व ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ उपनेतेपदी निवड झाली आहे. एकाच वेळी जिल्ह्यात तीन महत्त्वाची पदे मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आता जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अर्थमंत्र्यांच्या रूपात मुनगंटीवार यांच्या हाती राज्याच्या तिजोरीची चावीच आलेली आहे. त्यामुळे आता जिल्हा विकासासाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली आहे. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून अहीर यांनी रविवारी शपथ घेतली. त्यामुळे जिल्ह्याचे केंद्र सरकारशी संबंधित प्रश्न तातडीने निकाली लागतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आज या जिल्ह्यात प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या झाली आहे. एका पाठोपाठ एक वीज प्रकल्प येथे येत असल्याने यात भरच पडली आहे. याउलट, त्यावर उपाययोजना केली जात नाही. काही वर्षांपूर्वी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक येथे येऊन गेले. नीरी व आयआयडी मुंबईने प्रदूषण नियंत्रणाचा आराखडा तयार केला, परंतु त्यावर अजूनही अंमलबजावणी सुरू झालेली नाही. ही स्थिती बघता अहीर यांच्या मंत्रीपदाचा लाभ केंद्राशी संबंधित विविध समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. काँग्रेसच्या विधिमंडळ उपनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती झाल्याने त्याचाही लाभ या जिल्ह्याला मिळणार आहे. अहीर यांनी यापूर्वीच देशातील सर्वात मोठा कोळसा घोटाळा उघडकीस आणून चंद्रपूरचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले आहे. आता केंद्रीय मंत्री झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न मार्गी लावतील, असे विश्वासाने बोलले जात आहे.
देवतळे वनविकास महामंडळाचे अध्यक्ष होणार
काँग्रेस पक्षाशी जन्मापासूनचे असलेले नाते क्षणात तोडून भाजपवासी झालेले संजय देवतळे यांना वनविकास महामंडळाचे अध्यक्षपद मिळणार असल्याची चर्चा जोरात आहे. देवतळेंनी यापूर्वी हे पद सांभाळलेले आहे. त्यामुळे राज्यातील भाजप सरकार देवतळे यांना भाजपात स्थिर करण्यासाठी म्हणून या पदाची जबाबदारी सोपविणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. असे झाले तर पुन्हा भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करेल, अशीही चर्चा आहे. विशेष म्हणजे, निष्ठावंतांना डावलून देवतळे यांना भाजपने वरोरातून विधानसभेची उमेदवारी दिली होती.