ऊसदरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पुन्हा कागल तालुक्यातील शाहू साखर कारखान्याला जाणारी ऊस वाहतूक रोखून धरली. आंदोलकांकडून रस्त्यावर टायर पेटवणे, झाडे आडवी टाकणे असे प्रकार सुरू झाल्याने ते रोखण्यासाठी पुढे सरसावलेल्या पोलिसांवर जोरदार दगडफेक झाली. यामध्ये ३ पोलिसांसह ५ गृहरक्षक दलाचे जवान जखमी झाले. याप्रकरणी कागल पोलिसांनी तिघा आंदोलकांना अटक केली असून २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शाहू कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांनी सायंकाळी गळीत हंगाम सुरू करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दराबाबत केलेली तडजोड मान्य असून त्याप्रमाणे दर देणार असल्याचे घोषित केले.
   उसाला ३००० रुपये पहिली उचल मिळावी यासाठी आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकत्रे व शाहू कारखाना समर्थक हे गुरुवारी समोरासमोर भिडले होते. त्यांच्यात जबर मारहाणीचा प्रकार घडला होता. याबाबत काल चार गुन्हे कागल पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले होते. ही स्थिती पाहता आंदोलनाची तीव्रता कमी होईल असे वाटत होते, पण शुक्रवारी शेतकऱ्यांचे आंदोलन अधिकच उग्र झाले. पहाटे चार वाजल्यापासूनच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला हात घालताना कागल-निढोरी मार्गावरील सिद्धनेर्ली येथील नदी किनाऱ्याजवळून शाहू कारखान्याकडे जाणारी ऊसवाहतूक बंद पाडली. ऊस वाहून नेणारी सर्व वाहने रस्त्यातच अडकून पडली. आंदोलकांनी शेंडून फाटा येथे रस्त्यावर टायरी पेटवून देणे, झाडे आडवी पाडणे या मार्गाने वाहतूक विस्कळीत केली.
    आंदोलकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन पोलीस उपअधीक्षक विठ्ठल पवार हे मोठी कुमक घेऊन नदीकिनारी पोहोचले. त्यांनी शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. त्यावर आंदोलन करणारे शेतकरी शेंडून फाटय़ाकडे निघून गेले. तेथे काल दगडफेकीमध्ये जखमी झालेले बाबुराव चंदर शेवाळे हा शेतकरी शिवसनिक पोहोचला. त्यांनी आपल्या दुचाकीची मोडतोड पोलिसांनी केल्याचे आंदोलकांना सांगितले. त्यावरून तणाव निर्माण झाला असताना पोलिसांनी शेवाळे यास बाजूला नेले. पोलीस शेवाळेस घेऊन जात असताना जमावातून पोलिसांच्या दिशेने जोरदार दगडफेक सुरू झाली. संतप्त जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरू केला. लाठीमाराच्या भीतीने पळून जाणारे आंदोलक रस्त्यात पडलेले दगड पोलिसांच्या दिशेने फेकत होते. सुमारे पाऊण किलोमीटर अंतरावर पोलीस आंदोलकांचा पाठलाग करत असताना आंदोलकांनी प्रत्युत्तरादाखल फेकलेल्या दगडांचा खच रस्त्यात पडला होता. जमाव पांगल्यानंतर पोलीस पेटवलेल्या टायरी व झाडे काढून टाकण्यासाठी प्रयत्नशील होते. रस्त्यावर लांबलचक दगडांचा खच पडल्याने ते हटवताना मात्र पोलिसांना चांगलीच शिकस्त करावी लागली.
    जमावाने केलेल्या दगडफेकीत प्रशांत पांडव, विजय बद्दी, कुलदीप सूर्यवंशी या तीन पोलिसांसह गृहरक्षक दलाचे सहायक फौजदार एम. ए. चौगुले, के. एस. पोवार, ज्ञानेश्वर कोरे, जी. बी. चांदणे हेही जखमी झाले. तर पोलिसांनी २५ जणांविरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून बाबुराव शेवाळे, रामचंद्र बाळासाहेब शिपेकर, दत्तात्रय संभाजी भोसले या तिघांना अटक केली.
    
    चौकट
इंगळीत ग्रामस्थ-आंदोलक आमनेसामने
    स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ४८8 तासांचा महाराष्ट्र बंद पुकारला असताना इंगळी (ता. हातकणंगले) या गावात स्वाभिमानी संघटनेचे कार्यकत्रे स्वाभिमानी दूध संघाचे दूध संकलित करताना ग्रामस्थांना आढळले. एकीकडे बंद जाहीर करायचा आणि दुसरीकडे आपलीच दूध संस्था चालू ठेवायची हा स्वाभिमानीचा दुटप्पीपणा आहे असा आरोप करत ग्रामस्थांनी दूधसंकलन करणाऱ्या कर्मचारी, कार्यकर्त्यांना घेरले. त्यातून ग्रामस्थ व स्वाभिनीचे कार्यकत्रे परस्परांना भिडल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्याची दखल घेऊन सरपंच फिरोज नायकवडी, पंचायत समिती सदस्य रावसाहेब पाटील यांनी गावातील व्यवहार सुरू करण्याचे आवाहन सार्वजनिक ध्वनियंत्रणेवरून केले. त्याला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत बंद सुरूच राहणार असा पवित्रा घेतला. यावरून बराच काळ वादावादी सुरू राहिली. सायंकाळी चार वाजल्यानंतर गावातील व्यवहार पूर्ववत सुरू झाले.