होळीचा बेरंग होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी शहरात विशेष पथके तैनात केली असून ही पथके होळीनिमित्ताने पाण्याचे तसेच रंगांचे फुगे मारणाऱ्यांवर विशेष नजर ठेवणार आहेत. तसेच फुग्यामुळे दुखापत करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची तयारीही पोलिसांनी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, होळी उत्सवादरम्यान महिला तसेच मुलींची छेडछाड होऊ नये, याकरिता विशेष महिला पोलिसांची पथकेही तैनात करण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे.
होळी उत्सवाआधीच शहरात पाणी तसेच रंगाने भरलेले फुगे मारण्याचे प्रकार वाढू लागतात. या फुग्यांच्या माऱ्यामुळे काहीजण गंभीर जखमी तसेच जायबंदी झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. भाइंदर परिसरात राहणारी वैशाली दमानिया ही महिला गुरुवारी सायंकाळी लोकलमधून प्रवास करत होती. त्या वेळी लोकलवर फेकलेली पाण्याची पिशवी तिच्या चेहऱ्यावर आदळली आणि त्यात ती गंभीर जखमी झाली. याच पाश्र्वभूमीवर होळी उत्सवाला गालबोट लागू नये, याकरिता ठाणे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्या ठिकाणी पोलिसांची गस्तही वाढविण्यात आली आहे. शहरातील बहुतेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा सुरू आहे. ही परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थिनींवर रोमिओंकडून पाण्याचे फुगे फेकले जातात. तसेच रस्त्याने जाणाऱ्या महिला तसेच मुलींवरही अशा प्रकारच्या फुग्यांचा मारा करण्यात येतो. त्यामुळे अशा रोमिओंवर नजर ठेवण्यासाठी पाच पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये एक महिला पोलीस अधिकारी, दोन महिला कर्मचारी आणि दोन पुरुष कर्मचारी असणार आहेत. या पथकामार्फत अशा रोमिओंविरोधात महिला छेडछाडीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या वृत्तास ठाणे पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी दुजोरा दिला आहे. होळी खेळा मात्र तिचा बेरंग करू नका. पाण्याचे तसेच केमिकलयुक्त रंगांचे फुगे मारून दुसऱ्यांना इजा करू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
इमारतींच्या गच्चीवरही पोलिसांचा वॉच
होळी उत्सव जवळ येताच शहरातील इमारतींच्या गच्चीवर लपून रोमिओंकडून महिलांवर पाण्याचे फुगे फेकण्याचे प्रकार वाढीस लागतात. या फुग्यांमुळे महिला, मुली तसेच अन्य व्यक्तींना इजा पोहोचू शकते. त्यामुळे अशा प्रकारचे फुगे मारणाऱ्यांना रोखण्यासाठी ठाणे पोलिसांनी इमारतीतील पदाधिकाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.