महापालिकेच्या सिध्दार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालयात गेल्या काही दिवसांपासून आजाराने पीडित ‘भानुप्रिया’ वाघिणीचा बुधवारी सकाळी अखेर मृत्यू झाला. भानुप्रियाचे वय २२ वष्रे ५ महिने होते. वाघाचे सरासरी वय १५-१७ वष्रे असते.
वयोवृद्ध झालेल्या भानुप्रिया वाघिणीने गेल्या काही दिवसापांसून खाणेही वज्र्य केले होते. गेल्या १० दिवसांपासून आजारामुळे ती निपचित पडून होती. सलाईन व प्रतिजैविके देऊन तिला वाचविण्यासाठी प्रयत्न केले गेले. सिध्दार्थ उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयात नऊ वाघ आहेत. यातील ५ पांढरे वाघ आहेत, तर ४ पिवळे वाघ आहेत. त्यांना दररोज प्रत्येकी १४ किलो मांस खाद्य म्हणून दिले जाते. वेगवेगळया प्रकारचे १८९ प्राणी-पक्षी संग्रहालयात आहेत. त्यांना सांभाळण्यासाठी मात्र अलिकडे मोठी कसरत करावी लागत आहे. आवश्यक तरतूद मिळत नसल्याने प्राणीसंग्रहालयातील २०-२१ प्रकारची दुरूस्तीची कामे प्रलंबित आहेत. पिंजरे दुरुस्तीची काही कामे रखडली आहेत. जनावरांना मांस पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांची देयके काही दिवसापूर्वी प्रलंबित होती. त्यामुळे त्यांनी खाद्यपुरवठा करण्यास नकार दिला होता. मनपा आयुक्तांनी लक्ष घालून हा प्रश्न नंतर सोडविला. देयके देण्यास आताही दिरंगाईच सुरू आहे. मनपाची आंर्थिक स्थिती खालावल्याने प्राणीसंग्रहालयातील अनेक विकासकामे रेंगाळली आहेत. नव्याने निविदा दाखल करण्यास ठेकेदार पुढे येत नसल्याचेही चित्र आहे. ‘भानूप्रिया’ वाघिणीच्या मृत्यूमुळे एक वाघ कमी झाला आहे.