राहुरीच्या तनपुरे सहकारी साखर कारखान्याने चालू गळित हंगामातील उसाचा पहिला हप्ता तसेच ऊस वाहतूक दर व कामगारांची देणी थकवीली आहेत. थकित रकमा मिळाव्यात या मागणीसाठी शेतकरी मंडळाने उद्या (गुरूवार) रास्ता रोको आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
कारखान्याचे संचालक शिवाजी गाडे, बाळासाहेब चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काही संचालक उपोषण करणार असल्याची माहिती सचिव शिवाजी सागर यांनी दिली.
तनपुरे कारखान्याने २०११-१२ च्या हंगामातील २२१ रुपये प्रतिटनाप्रमाणे पैसे थकविले आहेत. तसेच चालू हंगामातील उसाचे पंधरवाडा पेमेंट केलेले नाही. कारखान्याचे कामगार, विवेकानंद नर्सिग होम, ऊस वाहतूकदार यांचे पैसे थकवीले आहेत. शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे १५ दिवसांच्या आत दिले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा कायदा आहे. पण अशी कारवाई अद्याप झालेली नाही. कारखान्याने उपपदार्थ व जमिनीची विक्री केली असून त्यातूनही देय रकमा अदा करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.