पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पत्रकारांना सुरक्षा प्रदान करणारा कायदा करण्यात यावा, तसेच गोंदियात पत्रकार भवनाकरिता जागा उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीकरिता श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने रविवार, ६ जानेवारी राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त गोंदिया उपविभागीय कार्यालयासमोर सकाळी ११ वाजतापासून धरणे देण्यात येणार आहे.
गोंदिया जिल्ह्य़ाची निर्मिती होऊन १२ वर्षांंचा काळ लोटला. शासनाने प्रत्येक जिल्ह्य़ात पत्रकार भवनाकरिता शासकीय जमीन उपलब्ध करून दिली, मात्र गोंदिया जिल्ह्य़ात अद्यापही शासकीय जमीन उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे अद्यापही येथे पत्रकारांना हक्काचे भवन नाही. त्वरित शहरात पत्रकार भवनाकरिता शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात यावी आणि शासनाने विचाराधीन असलेला पत्रकारांना सुरक्षा प्रदान करणारा कायदा अमलात आणावा, या दोन्ही न्याय मागण्याकरिता येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत धरणे होणार आहे.  पत्रकारांनी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेकरिता आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.एच.एच.पारधी व सचिव सावन डोये यांनी केले आहे.