scorecardresearch

पर्यटनाच्या नकाशावर नाशिकची ‘किंमत’

दीपावलीनिमित्त मिळालेल्या सुटीची संधी साधण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील पर्यटक पुढे सरसावले असून या हंगामात नेहमीप्रमाणे दक्षिण

दीपावलीनिमित्त मिळालेल्या सुटीची संधी साधण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील पर्यटक पुढे सरसावले असून या हंगामात नेहमीप्रमाणे दक्षिण भारतातील पर्यटन स्थळांना पसंती मिळाली असली तरी प्रथमच परदेशवारीचा कल वाढल्याचे अधोरेखित झाले आहे. काही दिवसांपूर्वी ४५ पर्यटकांचा गट श्रीलंका येथे जाऊन आला तर ५६ पर्यटकांचा गट सिंगापूरला रवाना होत आहे. देशातील पर्यटन स्थळांच्या तुलनेत परदेशात मुबलक सुविधा मिळत असल्याने पर्यटकांचा परदेशी सहलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. असे असले तरी कमी दिवसांच्या सुट्टीत अनेक जणांनी कोकणातील निसर्गरम्य वातावरणात रमणे पसंत केले आहे. राज्यात धार्मिक पर्यटनासाठी नाशिक-शिर्डी-त्र्यंबकेश्वर या त्रिकोणाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असल्याने नाशिकमधील धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांमध्येही चांगलीच वाढ झाली असून देशभरातील वाहतूक व्यावसायिकांच्या आरामदायक, निमआरामदायक गाडय़ांच्या गर्दीमुळे गोदाकाठावर दूपर्यंत गाडय़ाच गाडय़ा दिसत आहेत.
शहरातील धकाधकीच्या जीवनापासून दिवाळीच्या सुट्टीत काही दिवस का होईना, शांत व रमणीय परिसरांत भ्रमंती करण्याची उच्चभ्रूंपुरती मर्यादित राहिलेली मक्तेदारी मध्यमवर्गाने कधीच मोडून काढली आहे. उत्तर महाराष्ट्रातील पर्यटक कोकणला प्राधान्य देत असले तरी दक्षिण भारतातील केरळ, कन्याकुमारी, गोवा, तिरुपती बालाजी तसेच गुजरात या ठिकाणी भेट देणाऱ्यांची संख्याही बऱ्यापैकी असल्याचे ट्रॅव्हल्स असोसिएशनचे निरीक्षण आहे. परराज्यात जाणाऱ्या पर्यटकांनी केरळला पसंती दिली आहे. कोकण व केरळच्या पर्यटनात समुद्रकिनाऱ्यावर भटकंतीचा समान धागा आहे.
कोकणात तारकर्ली, मालवण, दिवेआगर, सावंतवाडी, दापोली, गणपतीपुळे या भागांत जाण्यासाठी सर्वाधिक नोंदणी झाली आहे. कोकणची सैर पर्यटकांच्या अपेक्षेनुसार होते. शिवाय, ती महाबळेश्वर व इतर महागडय़ा पर्यटन स्थळांच्या तुलनेत किफायतशीर ठरते. महाबळेश्वरला होणाऱ्या गर्दीच्या तुलनेत कोकणचा परिसर विस्तृत असल्याने या भागात अधिक शांतताही लाभते. एवढेच नव्हे तर, समुद्रकिनारा, गणपतीपुळे व अंजर्लाचा गणपती अशी धार्मिक ठिकाणे, वनराई, मुरूड व जंजिरासारखे गड-किल्ले असे फिरण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. या सर्व बाबी पर्यटकांना कोकणकडे खेचण्यास कारणीभूत ठरल्याचे पर्यटन व्यावसायिकांचे मत आहे.
परराज्यापाठोपाठ यंदा परदेशात पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. स्थानिक पातळीवरील काही पर्यटक परदेशी सहलीला पसंती देत असल्याचे चौधरी यात्रा कंपनीचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी ४५ पर्यटकांचा गट श्रीलंकेत फिरून आला. आता ५६ पर्यटकांचा गट सिंगापूरला रवाना होत आहे. स्थानिक पातळीवरील पर्यटक श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, मॉरिशस या ठिकाणी भ्रमंती करण्यासाठी उत्सुक असल्याचे चौधरी यांनी सांगितले. देशातील पर्यटन उद्योगाच्या विकासासाठी शासन पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नाही, सुविधा उपलब्ध करत नाही. राज्यातील सीमारेषेवर तपासणीच्या नावाखाली कित्येक तास अडकून पडावे लागते. यामुळे देशातील पर्यटन स्थळांच्या तुलनेत स्थानिकांना परदेशात सर्व सुविधा उपलब्ध होत असल्याने परदेश वारीला जाणाऱ्यांची संख्या वाढल्याचे नाशिक ट्रॅव्हल असोसिएशनचे अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल यांनी नमूद केले.
स्थानिक पर्यटक परराज्यासह राज्यातील विविध पर्यटन स्थळांना भेट देण्यात मग्न असताना परराज्यातील व महाराष्ट्राच्या इतर भागांतून पर्यटक मोठय़ा संख्येने नाशिकमध्ये दाखल झाल्याचे पाहावयास मिळते. रामकुंड, सीतागुंफा, काळाराम मंदिर, सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणी दर्शनासाठी पर्यटकांनी रांगा लावल्याचे दिसत आहे. यामध्ये दक्षिण, मध्य आणि उत्तर भारतातील पर्यटकांची संख्या अधिक आहे.
धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी हीच मंडळी परिसरातील इतर ठिकाणांनाही भेट देण्याचे नियोजन करतात. त्यात दादासाहेब फाळके स्मारक, इगतपुरी, भंडारदरा या निसर्गरम्य ठिकाणांचा समावेश आहे.
नाशिकमध्ये पर्यटकांना त्रासच अधिक
नाशिक हे धार्मिक क्षेत्र म्हणून पर्यटक श्रद्धापूर्वक शहरातील विविध धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर येत असले तरी त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. विशेषत्वाने पंचवटीत अधिक धार्मिक ठिकाणे असल्याने या ठिकाणी कसे जावे, पंचवटीतून इतर ठिकाणी जाण्याचे मार्ग कोणते, नाशिक परिसरात भेट देण्याजोगी इतर ठिकाणे कोणती यासंदर्भात कोणतीही माहिती पर्यटकांना उपलब्ध करून दिली जात नाही. याउलट रिक्षा व्यावसायिकांकडून होणारी आर्थिक लूट, वाहतूक पोलिसांचा येणारा विचित्र अनुभव असे प्रकारच अधिक घडतात. हे चित्र बदलल्यास नाशिकमध्ये भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कित्येक पटीने वाढू शकते, असेही उत्तर व दक्षिण भारतातून येणाऱ्या पर्यटकांचे मत आहे.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त ( Nasik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tourist choice for nashik