स्थानिक संस्था करावरून (एलबीटी) बेमुदत बंद पुकारून व्यापाऱ्यांनी जनतेस वेठीस धरले आहे. तर दुसरीकडे बंदमध्ये सहभागी न झालेल्या व्यापाऱ्यांनी अन्नधान्याचे भाव वाढवून जनतेची लूट सुरू केली आहे. व्यापाऱ्यांच्या साठेबाजमुळे बाजारातून साखर, तूरडाळ आदी  गायब होऊ लागले आहे.
एलबीटीविरोधातील बंदमध्ये सहभागी न झालेल्या व्यापाऱ्यानी ग्राहकांची लूट सुरू केली आहे. सध्या बाजारातून साखर आणि तूरडाळ गायब झाली आहे. घाऊक बाजारपेठा बंद असल्याचे कारण व्यापारी पुढे करीत आहे. परंतु प्रत्यक्षात ते अन्नधान्याची साठेबाजी करीत आहेत. बंद अधिक चिघळल्यानंतर दामदुपटीने नफा कमविण्याच्या इराद्याने ही साठेबाजी सुरू आहे. अशा व्यापाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.
संपात सहभागी नसलेल्या काही व्यापाऱ्यांनी आपले दुकाने सुरू ठेवली आहेत. मात्र या दुकानांमधून दामदुपटीने वस्तूंची विक्री केली जात आहे. काही दुकानांमध्ये साखर उपलब्ध असूनही तब्बल ५० रुपये प्रतिकिलो दराने तेथे साखरेची विक्री केली जात आहे. तर काही किराणा दुकानांमध्ये प्रत्येकाला केवळ पाव किलो साखर विकण्यात येत आहे.