पंचवटीतील नवीन आडगाव नाका ते कन्नमवार पुलापर्यंतच्या दोन्ही सव्‍‌र्हिस रस्त्यांवरील स्थितीचे अवलोकन केल्यास गॅरेज आणि मालमोटारींच्या गराडय़ाने वाहनधारकांचा जीव टांगणीला लागल्याचे लक्षात येते. मुंबई व धुळ्याकडे जाणारे बहुतांश वाहनधारक उड्डाण पुलाचा वापर करत नाहीत. परिणामी, भरधाव जाणाऱ्या वाहनांचा भार सव्‍‌र्हिस रस्त्यावर पडला आहे. तपोवनास भेट देणारे भाविक, पंचवटी महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी, वाहनधारक अशा सर्वाना जीव मुठीत धरून या भागातून मार्गक्रमण करावे लागते.
शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण, त्या अंतर्गत उभारलेला लांबलचक उड्डाण पूल यामुळे अंतर्गत वाहतुकीचे योग्य पद्धतीने नियमन होण्याऐवजी काही वेगळेच प्रश्न निर्माण झाले आहेत. उड्डाण पुलावरून मार्गस्थ होताना वाहनधारक जसे नियमांचे पालन करत नाहीत त्याचप्रमाणे सव्‍‌र्हिस रस्त्यावर स्थिती आहे. बाहेरगावी जाणाऱ्या वाहनांनी शहरात प्रवेश न करता थेट उड्डाण पुलावरून मार्गस्थ होणे आवश्यक आहे. परंतु, मोटारी, टेम्पो व तत्सम वाहने याच रस्त्यावरून जाताना दिसतात. मुळात, सव्‍‌र्हिस रस्ते हे शहरवासीयांसाठीची व्यवस्था आहे. तिथे महामार्गावरील वाहनांनी अतिक्रमण केल्यामुळे कोंडीत अधिकच भर पडली आहे. जुन्या आडगाव नाक्यावरून शहरातील वाहनधारक सव्‍‌र्हिस रस्त्यावर प्रवेश करतात. या चौकात सिग्नल यंत्रणा अस्तित्वात असली तरी तिचा वापर कधी होतो हे वाहतूक पोलीस सांगू शकणार नाही. नवीन आडगाव नाक्यावर यापेक्षा वेगळी स्थिती नाही. स्वामी नारायण मंदिराजवळून पंचवटी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गॅरेजधारकांचा कब्जा आहे. मालमोटारी व टेम्पोची दुरुस्ती करताना ही वाहने कायमस्वरूपी रस्त्यावर उभी असतात. जुना आडगाव नाका ते विजयनगपर्यंतच्या मार्गावर यापेक्षा वेगळी स्थिती नाही. हे रस्ते वाहनधारकांसाठी आहेत की गॅरेज व मालमोटारींच्या दुरुस्तीसाठी असा प्रश्न पडतो.
सव्‍‌र्हिस रस्त्यावर ठिकठिकाणी उभ्या राहणाऱ्या या वाहनांमुळे छोटे-मोठे अपघात आणि वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत. पंचवटीत येणारे भाविक तपोवनास आवर्जून भेट देतात. क्षमतेहून अधिक भाविकांना कोंबून रिक्षाचालक धोकादायक भागातून प्रवास करतात. ही बाब अपघातांना निमंत्रण देणारी ठरू शकते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याच पद्धतीने एका बाजूने दुसऱ्या बाजूला जावे लागते. सुरक्षिततेसाठी गतिरोधक नाही की साधे झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाहीत. एसटी महामंडळाच्या जागेवर गॅरेजवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. ही जागा ताब्यात घेण्यास महामंडळ उदासीन आहे. रस्त्यावरील मालमोटारी दुरुस्तीच्या कामाकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करतात. कोणी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केल्यास गॅरेजधारकांकडून दादागिरी केली जात असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. या ठिकाणी तुलनेत सव्‍‌र्हिस रस्ता आकाराने मोठा असल्याने वाहने भरधाव जातात. सिग्नल नसल्याने चौकातून शहरात जाऊ इच्छिणाऱ्यांची तारांबळ उडते. त्यामुळे काही अपघात घडले आहेत.

अतिक्रमण हटविण्याची गरज
गॅरेजधारकांच्या अतिक्रमणामुळे सव्‍‌र्हिस रोडवरील बराचसा भाग व्यापला गेला आहे. त्यातच, उड्डाण पुलाऐवजी वाहनधारक सव्‍‌र्हिस रस्त्यावरून मार्गक्रमण करतात. ही बाब वाहतूक कोंडी व अपघातांना निमंत्रण देणारी ठरली आहे. नवीन आडगाव नाका, जुना आडगाव नाका ते कन्नमवार पूल या भागात वाहतूक नियमनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. महाविद्यालयासमोर खबरदारीचा उपाय म्हणून ‘झेब्रा क्रॉसिंग’ पट्टे मारणे, वाहतूक पोलीस नियुक्त करणे, सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे याचाही गांभिर्याने विचार झाला नाही. तपोवनात जाणाऱ्या भाविकांसाठी भुयारी मार्गाची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
– ज्योती गांगुर्डे (नगरसेविका)