‘रस्त्यावर मंडप उभारा आणि वाहतुकीस अडथळा करा’ अशी उत्सवाची नवी परंपरा ठाणे शहरात गेल्या काही वर्षांपासून रजू लागली असून रस्त्याच्या एकतृतीयांश जागेवर गणेशोत्सवाचे मंडप उभारण्याची परवानगी महापालिकेने देऊ केली असतानाही त्याहून अधिक जागेवर अनेक मंडळांनी मंडप उभारल्याने शहरातील वाहतुकीचा प्रश्न यावर्षीही ऐरणीवर आला आहे. ठाणे महापालिकेच्या बोटचेप्या धोरणामुळे गणेशोत्सव मंडळांना कायद्याचा धाक उरलेला नाही. त्यामुळे नियम धाब्यावर बसवून उत्सव साजरा करण्याची ‘परंपरा’ यंदाही ठाण्यात कायम राहाण्याची चिन्हे असून नियम मोडणाऱ्यांमध्ये राजकीय नेत्यांनी यंदाही आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
रस्ते अडवून, वाहतुकीला अडथळा करून उत्सव साजरे करण्यात ठाण्यातील वेगवेगळी उत्सव मंडळे सुरुवातीपासून अग्रेसर राहिली आहेत. दहिहंडी उत्सवात आवाजाचा दणदणाट करायचा, गणेशोत्सवात रस्ते, चौक अडवून मंडपे उभारायची, असे प्रकार ठाणेकरांना नवे नाहीत. ठाण्याचे सत्ताधीश म्हणविणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी शहरातील प्रमुख चौक अडवून गणपती, नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्याचा पायंडा पाडल्यामुळे या पक्षाच्या पावलावर पाऊल ठेवत इतर राजकीय पक्षांनीही उत्सवातील अतिक्रमणाची ही ‘परंपरा’ सुरूच ठेवली आहे. ठाणे शहरातील रस्ते मुळात अरुंद असल्यामुळे अनेक ठिकाणी या रस्त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव नाही. वाहनांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने शहराला वाहतूक कोंडीचा विळखा बसला आहे. असे असताना ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागांत रस्ते अडवून उत्सव साजरे करण्यात येत असल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडू लागल्याचे चित्र आहे. ठाणे न्यायालयाने रस्त्यावर उत्सव साजरे करण्यासंबंधी काही र्निबध घातले असून त्याचे उल्लंघन सर्रासपणे गणेशोत्सव मंडळांकडून होताना दिसून येते. न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्याच्या एकतृतीयांश जागेवर गणेशोत्सव मंडप उभारण्याची परवानगी महापालिकेकडून मंडळांना देण्यात येते. अनेक गणेशोत्सव मंडळे एकतृतीयांशपेक्षा जास्त जागेवर मंडप उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. तसेच विद्युत रोषणाईसाठी नवेकोरे रस्ते खोदतात. असे चित्र यंदाही शहरात दिसून येत असून त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसारच गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी देण्यात येते आणि परवानगीपेक्षा जास्त जागेवर मंडप उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधित मंडळावर कारवाई करण्यात येते, असे  महापालिकेचे माहिती व जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी सांगितले.

आव्हाडपंथीय आघाडीवर
ठाणे येथील पाचपखाडी भागात वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या छत्रछायेखील साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी रस्ता अडवून भला मोठा मंडप उभारण्यात आला आहे. तसेच विद्युत रोषणाईसाठी खड्डे खोदून बांबू रोवले आहेत. मंडपाच्या शेजारी ठाणे परिवहन सेवेच्या बसचा थांबा असून मंडप आणि बस थांब्यामध्ये अरुंद जागा ठेवण्यात आल्यामुळे येथून बस जाऊ शकत नाही. एकप्रकारे या मंडपामुळे बसेसचा मार्ग बंद झाला आहे. घोडबंदर आणि चंदनवाडी भागात शिवसेनेच्या नेत्याशी संबंधित असलेल्या मंडळांनी दरवर्षीप्रमाणे रस्ता अडवून मंडप उभारला आहे. घोडबंदर येथील मंडपामुळे खेवरा सर्कल येथून मुंबई-अहमदाबाद मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाणे शहर, वागळे, कोपरी, घोडबंदर, कळवा आणि मुंब्रा परिसरातील अनेक मंडळांनी अशा प्रकारे मंडप उभारल्याचे चित्र दिसून येते.