विदर्भातील अवैध प्रवासी वाहतुकीच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. प्रवाशांचा लाखमोलाचा जीव धोक्यात घालणाऱ्या व वाहतूक नियमांचे उल्लंघन सर्रास सुरू असून सहा आसनी ऑटोरिक्षे, मॅक्सी कॅब, काळी पिवळी टॅक्सी यांच्यासह आता या वाहतुकीत अनेक लहान-मोठे खाजगी बस ऑपरेटर्सही उतरले असून दररोज शेकडो प्रवासी वेळ वाचविण्यासाठी पैसे मोजून स्वत:चा जीव धोक्यात टाकत आहेत. मात्र, याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे चित्र सध्या शहरांलगतच्या महामार्गावरून सर्रास सुरू असलेल्या खाजगी बस ऑपरेटर्सच्या अवैध प्रवासी वाहतुकीवरून दिसून येत आहे. याशिवाय, चार चाकीने जाणारे शहरातील काही अधिकारी रोज ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना सोबत घेऊन त्यांच्याकडून नाममात्र शुल्कही आकारत असल्याचे चित्र आहे.
शहरांचा जसजसा विकास होत आहे तशा शहराच्या सीमाही विस्तारल्या आहेत. त्यामुळे वाहनांच्या संख्येतही मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. सहाजिकच शहराच्या सीमा ओलांडून रोज ३० ते ६० किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतरावर नोकरी, शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यामुळे कार्यालये, महाविद्यालयांमध्ये मिळेल त्या वाहनाने जाणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. नागपुरातील अमरावती, उमरेड, वर्धा, भंडारा, गोंदिया, काटोल, सावनेर  या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, अनेक ठिकाणी जाण्यासाठी एसटीच्या बसेसची संख्या कमी किंवा त्या वेळेत नसल्याने या सर्व मार्गावर मॅक्सी कॅब, काळी पिवळी टॅक्सी, सहा आसनी ऑटो, ट्रॅक्सबरोबर खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसेसची संख्याही वाढली आहे. अनेकदा प्रवाशांना त्यांच्या वेळेत एसटी बसेस आणि इतर साधने उपलब्ध होत नसल्याने खाजगी बसेसने प्रवास करावा लागतो. त्यामुळे सहाजिकच गेल्या काही वर्षांत खाजगी बसचालकांची मनमानीही वाढली आहे. बसेसच्या मार्गावरील अतिक्रमणामुळे बसेस वेळेवर जात-येत नाहीत, प्रवाशांना तासन्तास बस प्रतीक्षेत वेळ घालवावा लागतो, मग नाईलाजाने तो पर्यायी अगर महागडय़ा वाहनाचा अवलंब करतो. त्यातच अशा खाजगी बसचालकांचे फावते.
या बसेसमधून प्रवास करताना परिवहन विभागाच्या कुठल्याही मुलभूत नियमांचा विचार करण्यात येत नाही. अगदी बसच्या अवस्थेपासून ते किती प्रवासी बसमध्ये भरायचे, याबाबत कुठलेही निश्चित धोरण दिसत नाही. सर्वकाही अगदी बेपर्वा वृत्तीने सुरू असते. मात्र, यात अनेकदा प्रवाशी भरडला जातो. सध्या नागपूरसह इतर शहरांमधीलही अनेक मार्गावर खाजगी बसेसची वाहतूक मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. अशा सर्व बसेसना टप्पा वाहतूक म्हणून वेगवेगळ्या ठिकाणांहून प्रवासी घेणे किवा उतरविण्याची परवानगी नसते. मात्र, खाजगी बसचालक हे नियम मोडून मोठय़ा प्रमाणात प्रवासी वाहतूक करतात. धक्कादायक बाब म्हणजे, एका बसच्या परवान्यावर खाजगी ऑपरेटर्स दोन ते तीन बसेस चालवितात. त्यामुळे खाजगी ऑपरेटर्स परिवहन विभागाच्या जवळपास सर्वच नियमांना धाब्यावर बसवून वाहतूक करतात. कित्येक बसेस टपावरून आणि दोन्ही बाजूंनी गळत असतात. वाहनचालकाजवळच्या समोरच्या खिडक्यांना काचा नसतात. सीटस्ची अवस्था बसण्यायोग्य नसतात. इंजिनवर झाकण नसते. हेडलाईट चालू नसतात. बसमध्ये एखादाच दिवा मिणमिणत असतो. कित्येकदा काही खिडक्यांच्या काचाही नसतात. बसेसचे पत्रे फाटलेले असतात. मात्र, या दयनीय अवस्थेकडे खाजगी ट्रॅव्हल्स मालकांचेही लक्ष नसते. त्यामुळे प्रवाशांना अशाच अवस्थेत जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागतो. वाहनचालकही बसेस मार्गावर नेताना तपासून घेत नाहीत.
गेल्या काही वर्षांत महामार्गावर अवैध पद्धतीने प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बसेसला अपघात झाल्याची उदाहरणे ताजी आहेत. अनेकदा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसमध्ये कोंबणे, केवळ काही पैशांसाठी बसचालक आणि वाहक बसमध्ये जागा नसतानाही काही पैसे कमाविण्यासाठी बसेसच्या कॅबिनमध्ये चालकाशेजारी बसविणे किंवा दरवाजात उभे राहू देणे, यासारखे प्रकार सर्रास करताना दिसून येतात. यातून अपघात होत असून त्यात प्रवाशांचा नाहक बळी गेलेले आहेत.
या अवैध वाहतुकीला रोखण्यासाठी प्रशासनही गंभीर दिसत नसल्याचे यावरून दिसून येत आहे.