सार्वजनिक आरोग्य विभागाने संपूर्ण राज्यातील गट-अ संवर्गातील एकूण ४० वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय बदल्या केल्या आहेत. यात विदर्भातील १३ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, बदल्या झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी त्वरित रुजू व्हावे अन्यथा, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
बदल्या झालेल्या विदर्भातील १३ वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये नागपूर जिल्ह्य़ातील ४ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. १३ पैकी ९ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून, तर ४ जणांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूर जिल्ह्य़ातील तिघांची विनंती, तर एकाची प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्य़ातील कान्होलीबारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवती यक्कलदेवी यांची नागपुरातील राज्य क्षयरोग प्रशिक्षण केंद्रात विनंती बदली, तर राज्य क्षयरोग केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता सिरास यांना पुणे येथील राज्य क्षयरोग नियंत्रण केंद्रात विनंतीवरून पाठवण्यात आले आहे. खापा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. शाफिया फतिमा यांची नागपुरातील कुष्ठरोग नियंत्रण केंद्रात विनंती बदली, तर याच प्राथमिक केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अ.वा. देशमुख यांची गडचिरोली जिल्ह्य़ातील जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रशासकीय बदली करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्य़ातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव इंगळे यांची विनंतीवरून यवतमाळ जिल्ह्य़ातील नेर ग्रामीण रुग्णालयात, गोंदिया येथील बी.जी.डब्ल्यू रुग्णालयातील डॉ. आशा अग्रवाल यांची गोंदिया जिल्ह्य़ातीलच रजेगाव ग्रामीण रुग्णालयात प्रशासकीय बदली करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्य़ातील गौल प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जयकुमार गलसिंग नाईक यांना या जिल्ह्य़ातीलच पुसद उपजिल्हा रुग्णालयात विनंतीवरून पाठवण्यात आले आहे. गडचिरोली पोलीस रुग्णालयातील डॉ. जयश्री हुजरे यांची लातूर जिल्ह्य़ातील निवळी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रशासकीय बदली, तर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयातील डॉ. नागसेन साखरे यांची कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात, तसेच यवतमाळ जिल्ह्य़ातील वडगा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. शिवाजी खंदारे यांनाही विनंतीवरून नांदेड जिल्ह्य़ातील जलधारा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्य़ातील राजुरा ग्रामीण रुग्णालयातील डॉ. आर.बी. गायकवाड यांची जिल्ह्य़ातीलच कोरपना ग्रामीण रुग्णालयात प्रशासकीय बदली, तर गडचिरोली जिल्ह्य़ातील गोदलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. बागराज धुर्वे यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात व यवतमाळ जिल्ह्य़ातील बोरी (अरब) प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रजनी रामदास उरकुडे यांचीही विनंतीवरून दारव्हा ग्रामीण रुग्णालयात बदली करण्यात आली आहे.
बदली झालेल्या या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या बदली झालेल्या ठिकाणी त्वरित हजर व्हावे व तसा अहवाल त्या त्या विभागीय उपसंचालकांनी आरोग्य संचालकांकडे पाठवावा. बदली झालेल्या अधिकाऱ्यांची कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करू नये, तसेच आदेश निघाल्यापासून एक आठवडय़ात संबंधित अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करावे. बदली झाल्यानंतरही रुजू न झालेल्या अधिकाऱ्यांचे १६ फेब्रुवारी २०१४ नंतरचे वेतन व भत्ते काढू नयेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना एक आठवडय़ाच्या आत कार्यमुक्त न केल्यास संबंधित पर्यवेक्षकीय अधिकारी, तसेच उपसंचालकांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही शासनाने काढलेल्या अध्यादेशात म्हटले आहे.