अनेक वर्षांपासून एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांवर महापालिकेने बदल्यांचा बडगा उगारला असून एका झटक्यात ६३ अधिकाऱ्यांना त्यांच्या नेहमीच्या विभागातून दुसऱ्या विभागात पाठवले आहे. यातील बहुतांश बदल्या कर वसुली किंवा कर विभागातील आहेत. उल्लेखनीय म्हणजे स्थायी समितीचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी संपत्ती कराच्या फेरमूल्यांकनाच्या मुद्दय़ावर कर विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. संपत्ती कर विभाग हा महापालिकेच्या महसूलाचा सर्वात मोठा स्रोत असूनही संपत्तीच्या फेरमूल्यांकनाचे निकष तपासण्यात अधिकाऱ्यांनी चालढकल चालविल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
एकूण ६३ अधिकाऱ्यांच्या बदल्या त्यांच्या नेहमीच्या विभागातून अन्य विभागात करण्यात आल्या असून यात कर वसुली विभागाच्या ४८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांना कामाच कुचराई केल्याचीच ही शिक्षा समजली जात आहे. झोपडपट्टी विभागातील ३, हॉटमिक्स प्लांट विभागातील १, विकास अभियांत्रिकी विभागातील १, जलप्रदाय विभागातील २ आणि जकात विभागातील एका अधिकाऱ्यालाही स्थानांतरित करण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण प्रशासकीय विभागाने बदल्यांची यादी तयार करताच बदलीत नाव असल्याच्या अफवेने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये दहशत पसरली. वर्षांनुवर्षे एकाच विभागात राहून ‘अर्थ’ कारण करण्याची सवय लागलेल्या या अधिकाऱ्यांवर अशी मोठी एकमुष्ठी बदल्यांची कारवाई पहिल्यांदाच झाली आहे.
बदली झालेले अधिकारी इस्टेट सहायक अभियंता, कनिष्ठ निरीक्षक, महसूल निरीक्षक या दर्जाचे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर वसुली विभागातील अधिकाऱ्यांच्या विरोधात जनतेच्या प्रचंड प्रमाणात तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेऊन महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी बदल्यांची कुऱ्हाड चालविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. विशेषत: कर वसुली विभागावर आसूड उगारण्याची संधी त्यांनी साधली आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अंतिम निर्णय गेल्या ११ मे रोजी घेण्यात आला. यादीनुसार ११ अधिकाऱ्यांना लक्ष्मीनगर झोनमध्ये, ५ अधिकाऱ्यांना धरमपेठ झोनमध्ये, १० अधिकाऱ्यांना हनुमान नगर झोनमध्ये, एका अधिकाऱ्याला धंतोली झोनमध्ये, ५ अधिकाऱ्यांना नेहरू नगर झोनमध्ये, ७ अधिकाऱ्यांना गांधीबाग झोनमध्ये, ५ अधिकाऱ्यांना सतरंजीपुरा झोनमध्ये, १० अधिकाऱ्यांना लकडगंज झोनमध्ये, ४ अधिकाऱ्यांना मंगळवारी झोनमध्ये तर ५ अधिकाऱ्यांना आसीनगर झोनमध्ये बदलीवर पाठविण्यात आले आहे. या बदल्या तात्पुरत्या बदल्यांच्या सुवरुपातील असून फक्त संपत्ती कर विभागापुरत्या मर्यादित आहेत. नियम व शर्तीनुसार तात्पुरती बदली झालेल्या अधिकाऱ्याला पुन्हा त्याच्या मूळ विभागात स्थानांतरित केले जाऊ शकते. परंतु, नागपूर महापालिकेच्या इतिहासात या विभागातील बदली झालेल्या अधिकारी वा कर्मचाऱ्यांची पुन्हा मूळ विभाग किंवा कार्यालयात परत बदली केल्याची नोंद नाही.