आगामी लोकसभा निवडणूक लक्षात विचारात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिका-यांनी जिल्हय़ातील सर्वच सरकारी व निमसरकारी अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या मे २०१४ पर्यंत स्थगित ठेवण्याचे तसेच बदल्यांचे आदेश काढले तरी त्यांना बदलीच्या ठिकाणी जूननंतर कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
सध्या जिल्हा व तालुकास्तरावर लोकसभा निवडणुकीचे कामकाज सुरू आहे. निवडणुकीचे मुख्य काम एप्रिल-मे दरम्यान पूर्णत्वास येणार आहे. या कामकाजासाठी विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचा-यांची माहिती विहित नमुन्यात जिल्हा निवडणूक शाखेस प्राप्त झाली आहे, परंतु बहुतेक कार्यालयातून एप्रिल, मेमध्ये अधिकारी व कर्मचा-यांचे बदल्यांचे आदेश निघत असतात, त्यानुसार ते नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होत असतात. परंतु निवडणूक शाखेकडे आलेल्या माहितीमध्ये या अधिकारी व कर्मचा-यांचा कार्यालयीन पत्ता हा पूर्वीच्याच कार्यालयाचा असल्याने निवडणूक कामकाजाचे आदेश निर्गमित करणे अडचणीचे व वेळखाऊ होते, त्यामुळे बदलीचा मेमो होणार असेल तर लोकसभा निवडणुकीस अधीन राहून सर्व अधिकारी व कर्मचा-यांना नवीन बदलीच्या ठिकाणी जून २०१४ मध्ये कार्यमुक्त करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पुढील महिन्यांपासून बहुतेक सरकारी विभागातील अधिकारी व कर्मचा-यांना बदल्यांचे वेध लागतात. जिल्हा परिषदेत तर रोजच सेवावर्ग करण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. या आदेशामुळे सेवावर्गचे प्रयत्न तात्पुरते थांबतील. एप्रिल मेमध्ये सर्वच वर्ग तीन व चारमधील कर्मचा-यांच्या बदलीचे आदेश निघत असतात, त्यासाठी मंत्रालयातून बदल्यांचे प्रमाण ठरवून दिले जाते. यंदा असे आदेश मंत्रालयातून निघतील का याबद्दल उत्सुकता आहे.
लोकसभा निवडणुकीचा कालावधी संपल्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीचे वेध लागत आहेत. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे, त्यापूर्वी त्याचे कामकाज सुरू होईल व आचारसंहिताही जारी होईल. तत्पूर्वी जून, जुलैमध्ये नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन शाळा सुरू झालेल्या असतील. अशा काळात बदल्या झाल्यास त्या गैरसोयीच्या होणार आहेत, त्यामुळे या वर्षांत बदल्या होण्याची शक्यता कमीच असल्याची चर्चा कर्मचा-यांमध्ये होऊ लागली आहे.